नागोठणे : मृताच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊनच पोलिसांच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवागृहात ठेवण्यासाठी पनवेलला नेला. आमच्या लेखी मागण्या रास्त असून रिलायन्स कंपनी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले.येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात २७ नोव्हेंबरपासून प्रवेशद्वारासमोर लोकशासनच्या वतीने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी जगदीश वारगुडे या आंदोलनकर्त्या तरुणाचे निधन झाले होते. मंगळवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट दिली असता, शेकडो आंदोलनकर्ते, वारगुडे यांच्या अकाली मृत्यूमुळे गंभीर झाले असून २६व्या दिवशीसुद्धा ठाम आहेत. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांची भेट घेतली असता, ही आरपारची लढाई असून निर्णय झाल्याशिवाय वारगुडे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारगुडे यांचा लहान भाऊ सध्या आसाम येथे भारतीय सैन्यात कार्यरत आहे. त्यांची तसेच आईवडील आणि बहिणीची परवानगी घेऊनच मृतदेह पनवेल येथे शवागृहात ठेवण्यात आला आहे. रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने सोमवारी सायंकाळी या ठिकाणी भेट देऊन गेले आहेत. आंदोलनाची पुढील दिशा आमचे मुख्य नेते बी. जी. कोळसे पाटील यांच्याकडून लवकरच जाहीर केली जाईल, असे गायकवाड यांनी या वेळी स्पष्ट केले. संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांच्या म्हणण्यानुसार, वामन पाटील आणि उमाजी घासे हे दोन वृद्ध पहिल्या दिवसापासून येथे उपस्थित होते. मात्र, त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ताई घासे या वृद्ध महिलेसह विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कडाक्याच्या थंडीने त्रास मृत जगदीश वारगुडे हा पहिल्या दिवसापासून सोमवारच्या पहाटे सहापर्यंत येथेच राहात होता. येथील कडाक्याच्या थंडीने त्याला त्रास झाल्याने सहा वाजता तो येथून त्याच्या वेलशेत येथील घरी गेला होता. मात्र, त्याला सकाळी ११नंतर जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला नागोठण्यातील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याला मृत्यूने गाठले होते.