रायगडला अवकाळीचा फटका, आंबा, नारळ, काजू बागांचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:46 AM2020-05-01T01:46:05+5:302020-05-01T01:46:27+5:30
या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यांत २९ एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात बुधवारी रायगड जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. भात, आंबा, काजू, सुपारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे तर वादळी वाºयामुळे झाडे पडून घरांची पडझड झाली आहे. या सर्वांची नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट आले असून, देशात व राज्यात या महामारीमुळे घोषित के लेल्या लॉकडाउनचा फटका अनेक गरीब मजुरांना, शेतकऱ्यांना बसला आहे. हे कमी की काय, म्हणून बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान के ले आहे. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ग्रामीण व काही शहरी भागातील घरांचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेल्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, काजूच्या बागांनाही फटका बसला असून, मुरुडमध्ये आंबा बागेतील झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
>यांच्या घरांचे झाले नुकसान
सावळे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून गेले. तर सावळे गावातील भालचंद्र दळवी, गोपाळ दळवी, संतोष रघुनाथ धुळे, अनंता धुळे, काशीनाथ धुळे, मारुती माळी, अनंता मोडक, दगडू मोडक, मधुकर पोसू धुळे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पाथरज ग्रामपंचायतीमधील मोरेवाडी येथील अंगणवाडी शाळा आणि एक घरकूल यांचे वादळाने नुकसान केले आहे.
>पंचनामे तातडीने करा-तहसीलदारांची सूचना
कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिल्या आहेत. महसूल कर्मचारी, वीज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या अधिपत्याखाली येणारी कामे, समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.