दासगाव : शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण महाड तालुक्यात हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. या पावसाचा फटका कडधान्य आणि आंबा पिकाला बसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भातपीक नष्ट झाले, शेतकरी फार खचून गेला असताना, कडधान्याचे कोठार समजले जाणाऱ्या महाड तालुक्यामध्ये परतीच्या पावसाचे पाणी शेतामध्ये साचून राहिले होते. त्यामुळे कडधान्य मूग, मटकी, पावटा, वाल, हरभरा याची पेरणी उशिरा झाली. मात्र, या पावसामुळे या कडधान्याच्या शेतीला बाधा येणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. त्याचबरोबर, काही दिवसांपासून महाड तालुक्यात थंडीने डोके वर काढले असल्याने आंब्याच्या झाडाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. या पावसामुळे हा मोहर गळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.पनवेलमध्ये शहरातील रस्ते ओलेचिंब झाले होते. हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप गुलाबी थंडीची चाहूल लागलेली दिसत नसताना पहाटे सुरू झालेल्या अवकाळी पावसाने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसात भिजणे टाळण्यासाठी छत्र्यांचा वापर केल्याचे या वेळी दिसून आले. बोर्ली-मांडला येथे जनजीवन विस्कळीतबोर्ली-मांडला : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुरूडसह नांदगाव-मजगांव, बोर्ली-मांडला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अचानक हवामात बदल घडून पडलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या उडव्या, पेंढा भिजल्याने, तसेच शेतात नुकतेच पेरलेल्या वाल, रताळी आदी फळभाजी-पाला व आंब्याच्या पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुरूड तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह अवकाळी पाऊस आगरदांडा : मुरूड तालुक्यात शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडल्याने रब्बी हंगमात लावलेल्या पिकांना मोठा धोका पोहोचणार आहे.दिवाळीदरम्यान आणि दिवाळीच्या आधीही कोसळलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अधीच हवालदिल झाला आहे. शेतामध्ये कापणी करून ठेवलेली उरले सुरलेले भातपीक पुन्हा पावसाने भिजले. आता पाऊस थांबला असला, तरी ही भिजलेली रोपे आता कुजली आहेत. भात हे मुरूड पंचक्रोशीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. सुरुवातीला सलग तीन वेळा मुसळधार पावसामुळे भातशेतीचे काही प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे उरले-सुरले भात पीक व रब्बी हंगमात लावलेले वाल, चवळी, कलिंगड व अन्य पिकांच्या नुकसानीने शेतकरी चिंतेत आहेत.बागायतदारांना ही अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. फुल बागायती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फुले पावसात भिजून गेल्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत कृषी कार्यालयानेही कडधान्य पिकांना धोका पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १५ मिलिमीटर पावसाची नोंदमुरूड तालुक्यात सकाळी ४ पासून ते ९ पर्यंत किमान १५ मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे. त्यामुळे आंब्यासहित कडधान्य पिकालाही धोका पोहोचला आहे. वारंवार अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकरी पुरते हैराण झाले आहेत, परंतु अवकाळी पाऊस थांबत नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्याची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनास येत आहे.बागायतदारांनाही बसणार फटका कडधान्य घेणारी गावे आंबोली, शिघ्रे, वांदे, उदरगाव, नांदगाव, मजगाव, उसरोली आदी भागांत वाल, सफेद कांदा, चवळी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जतात, परंतु अवकाळी पावसामुळे ही पिके धोक्यात आल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. बागायतदारांना ही अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात, कडधान्य, आंबापीक धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:32 AM