भाई कोतवाल चौकातील स्मृतिस्तंभाचे अनावरण
By admin | Published: September 11, 2015 01:21 AM2015-09-11T01:21:42+5:302015-09-11T01:21:42+5:30
पेणच्या नगरपरिषद इमारतीसमोरील कोतवाल चौकात क्रांतिकारकाची निशाणी मशाल व हुतात्मा भाई कोतवाल यांचे नामकरण असलेला स्तंभ याचे अनावरण पेण नगर
पेण : पेणच्या नगरपरिषद इमारतीसमोरील कोतवाल चौकात क्रांतिकारकाची निशाणी मशाल व हुतात्मा भाई कोतवाल यांचे नामकरण असलेला स्तंभ याचे अनावरण पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व पेण शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते झाले. संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संत सेना महाराजांची पालखी व वारकरी भजनी सांप्रदाय मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पेण शहरातील प्रमुख चौक म्हणून कोतवाल चौकाचा पूर्वापार नावलौकिक आहे. सध्या या ठिकाणी नगर परिषदेची इमारत आहे. समोर चौकात बसविलेली हायमास्ट पथदिव्यांच्या चौकोनात हुतात्मा भाई कोतवालाची स्मृती म्हणून क्रांतिस्तंभावर मशाल व त्या अग्रणी भागास हुतात्मा भाई कोतवाल चौक असे नामकरण फलकाचे अनावरण झाले आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या पर्यटक व इतर नागरिकांना या कोतवाल चौकाची ओळख पटेल. यावेळी पेण न.प. गटनेते अनिरुध्द पाटील, संत सेना महाराज मंडळाचे पदाधिकारी व वारकरी भजनी मंडळी व नागरिकांची उपस्थिती होती.
काँग्रेस नेते व माजी मंत्री रवि पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या मागणीनुसार कोतवाल चौकात हा क्रांतिकारकांची आठवण करुन देणारा स्मृती स्तंभ उभारुन पेण नगर प्रशासनाने चांगली कामगिरी केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.