ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका : वाड्यात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी, विभागवार आढावा बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:26 AM2021-01-22T08:26:29+5:302021-01-22T08:27:25+5:30
कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या एप्रिल ते मे महिन्यात होणार असून या निवडणुकांबाबत गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी गुरुवारी भाजपच्या वतीने विभागवार दौरा आयोजित केला होता. या वेळी ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे इतर राजकीय पक्षांची ग्रामपंचायतीबाबत काहीच तयारी नसल्याने भाजपचे एक पाऊल पुढे असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील रणधुमाळी संपली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका येत्या एप्रिल ते मे महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवार निवड, उमेदवारांचे जातीचे दाखले, जात पडताळणी दाखले, यापूर्वी ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व आहे, भाजपची कोणकोणत्या ग्रामपंचायतीत सत्ता आहे, भविष्यात कोणत्या ग्रामपंचायतीत प्रयत्न करावे लागणार आहेत याचा सखोल आढावा घेण्यासाठी गुरुवारी बैठका झाल्या. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून याची माहिती घेतली.
कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे, माजी आमदार पास्कल धनारे, हरिश्चंद्र भोये, डाॅ. हेमंत सवरा, सुरेखा थेतले, समीर पाटील आदी वरिष्ठ नेते उपस्थित हाेते. गावपातळीवरील आपापसांतील मतभेद विसरून पक्षासाठी एकत्र येण्याचे मार्गदर्शन नेत्यांनी कार्यकर्त्यांना या बैठकीत केले.
वाडा तालुक्यात भाजप पहिल्या क्रमांकावर राहून बहुतांशी ग्रामपंचायतींत भाजपचा झेंडा कार्यकर्ते फडकवतील, असा ठाम विश्वास आहे.
- मंगेश पाटील, तालुका अध्यक्ष, भाजप वाडा तालुका