Uran: हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चेनंतरही ठोस तोडगा नाही, जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:40 PM2023-04-11T21:40:50+5:302023-04-11T21:41:09+5:30
Raigad : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
- मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची विचारविनिमय करण्यासाठी तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली आहे.त्यामुळे जेएनपीए विरोधात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम आहे.
जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे. मात्र या जागेची मालकी जेएनपीएकडे असली तरी प्लानिंग ॲथोरिटी सिडको आहे.त्यामुळे जेएनपीए टाऊन प्लॅनिंग विभागाच्या मंजुरीनंतरही आराखड्याला सिडकोची मंजुरी आवश्यक असल्याने मंजुरीसाठी सिडकोकडे पाठविण्यात आला आहे.जेएनपीए रचनाकार विभागाने तयार केलेल्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत.हा त्रुटी असलेला आराखडा मंजुरीसाठी वारंवार जिल्हा टाऊन प्लॅनिंग, सिडको आणि बोर्ड ऑफ ट्र्स्टीच्या बैठकीत ठेवून जेएनपीएने वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा आरोप हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी केला आहे. त्रुटी दूर करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आराखडाच मागील काही महिन्यांपासून शासनाच्या लालफितीत अडकलेला असल्याने मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमधील असंतोषाची भावना अनावर झाली आहे.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे, मनिषा जाधव, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, रविंद्र पाटील, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,वपोनि संजीव धुमाळ, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी,हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाबाबत असलेल्या विविध त्रुटींबाबत चर्चा झाली. आराखड्यातील आवश्यक त्रूटी दूर करण्याची तयारीही जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन दर्शवली आहे.मात्र सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची विचारविनिमय करण्यासाठी आजच तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.