मधुकर ठाकूर, उरण: उरण तालुक्यातील सिडकोच्या आरपीझेड प्रकल्पासाठी भू- संपादनास शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवित एकजूट होऊन संघर्ष करण्याचा निर्णय सोमवारी (२१) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सिडकोने प्रस्तावित आरपीझेड प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील फुंडे,बोकडवीरा, नागाव,रानवड-केगाव महसुली गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे.सिडकोच्या या भूसंपादन प्रक्रियेला याआधीच शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.तसेच सिडको भवनावर हल्लाबोल करत विरोध दर्शवित शेकडो शेतकऱ्यांनी हरकतीची लेखी पत्र दिली आहेत.त्यानंतर सिडकोने हरकती नोंदविण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली होती.त्यानंतरही शेतकऱ्यांनी विरोधाची धार कायम ठेवली आहे.त्यानंतर भूसंपादन करण्यासाठी सिडकोचा हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.
त्यामुळे नोटीफिकेशनला विरोध करण्यासाठी व शेतक-यांची, प्रकल्पग्रस्तांची मोट बांधून एकत्रित लढा देण्याची तयारी करण्यासाठी संबंधित महसुली गावातील शेतकऱ्यांची सोमवारी (२१) बैठक झाली.
उरणमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात शेतकरी , प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, काका पाटील, संतोष पवार, केगाव संरपच आशिष तांबोळी, म्हातवली माजी सरपंच चारुदत्त पाटील, नागाव माजी सरपंच अनंत घरत, माजी पंचायत समिती सदस्य महेश म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे , अरविंद घरत, संजय ठाकूर, श्रीराम म्हात्रे, अनंत घरत, मधुकर म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रशांत माळी, सुनिल भोईर, निलेश भोईर, सीताराम नाखवा, भालचंद्र म्हात्रे, हेमदास गोवारी, सुरज पाटील , के एल कोळी आदि मान्यवर तसेच उरण तालुक्यातील विविध गावातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करताना उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. राजाराम पाटील यांनी सिडकोचा भूसंपादन कायदा, गावठाण विस्तार कायदा व इतर कायद्या विषयी माहिती देऊन संघर्षांतुनच शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.तर रामचंद्र म्हात्रे यांनी सिडको आणि महसूल विभागाचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी संघर्षासाठी उतरण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वांनी एकत्र येत सिडकोच्या भू संपादनाला विरोध दर्शविला व सर्व शेतक-यांनी एकत्र येत हा लढा लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.