उरणमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:33 AM2019-06-30T00:33:02+5:302019-06-30T00:33:18+5:30
शुक्रवारी सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उरण : उरण तालुक्यात शुक्रवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागाव गावातील एका रहिवाशाच्या घरावर झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विविध ठिकाणी रस्त्यांंवर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, उरण नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, जेएनपीटी, आपतकालीन व्यवस्थापन तसेच संबंधित खात्याच्या प्रशासनाने पावसाळी पाणी निच-याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरण तहसील, उरण नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, जेएनपीटी, आपतकालीन व्यवस्थापन तसेच संबंधित खात्याच्या प्रशासनाने पावसाळी पाणी निच-याची व्यवस्थाच न केल्याने उरण शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. तसेच भाजी मंडईतही पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली.
उरण - पनवेल रस्त्यावरील काही भागात पावसाचे पाणी साचले आहे, तसेच सोनारी, जासई, चिर्ले आदी गावातील सखल भागात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्याने रहिवाशांना विद्युत पुरवठा करणारे मीटर तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत. नागाव गावातील एका रहिवाशाच्या घरावर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड दूर करण्याचे काम सुरू आहे.