उरण : चिरनेर परिसरात दलालांचा सुळसुळाट, सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 05:53 PM2023-05-17T17:53:04+5:302023-05-17T17:53:36+5:30
वाढत्या भरावामुळे चिरनेर गावाला पुराचा वाढता धोका, पुढील पिढ्यांचे आयुष्य अंधारात
मधुकर ठाकूर
उरण परिसरातील खाडीकिनारी तसेच खाडीच्या बाजूस असलेल्या सोन्यासारख्या पिकत्या जमिनी दलालामर्फत कवडीमोल भावात विक्री केल्या जात आहेत.याच शेतजमिनींवर विकासक, भांडवलदार मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिरनेर आणि चिरनेर परिसराला दलालांचा वेढा पडला आहे.विकासाच्या नावाखाली बाहेरील खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजकांनी वाडवडिलांनी राखुन ठेवलेल्या पिढीजात जमिनी शेतकऱ्यांना भुरळ घालून त्यांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गावागावात दलाल नेमले आहेत. या दलालांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.हे दलाल शेतकऱ्यांना भुलथापा मारीत आणि भविष्याची गोड स्वप्ने दाखवून अगदी कवडीमोल भावाने येथील जमिनींची खरेदी करीत आहेत.
जमीनी खरेदी केलेले खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजक दलाल विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाडी, खाडी किनारी,नाले, सीआरझेड परिसरात बहुतांशी जमिनीवर मातीचा भराव केला जात आहे.मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडी, खाडी किनारे, नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही.
यामुळे परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. यामुळे गावातील सखल भागात पाणी साचून या भागातील घरे पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय येथील नागरीकांच्या जीविताला मोठा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे.
पुढील पिढ्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे यासाठी खाजगी खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योगजकांना आपल्या सोन्यासारख्या जमिनी शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने विकू नका असे आवाहन मातृछाया जनसेवा फाउंडेशनच्या उरण तालुका महिला अध्यक्षा सविता खारपाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
चिरनेर परिसरात खाजगी उद्योजकांनी जमिनी खरेदी करण्यासाठी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. भाताचे पीक, वाल, चवळी, कडधान्य पीक देणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्यामुळे येथील पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. चिरनेर परिसरात गोदामे वाहतूक कोंडी प्रदूषण यामुळे येथील नागरिक बेजार झाले असून, विविध प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान सोन्यासारख्या जमिनी खाजगी उद्योजकांना कवडीमोल भावात विकल्या जात असल्यामुळे उद्योजकांचे उखळ पांढरे झाले आहे.असे खासगी विकासक कसेही आणि कुठेही भराव करित आहेत.यामुळे परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते असल्याची संतप्त प्रतिक्रिया विजय भगत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.