उरण - उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची पाणी बिलापोटी एमआयडीसीची २१ कोटींची थकबाकी असतानाच, आता उरण नगर परिषदही थकबाकीत मागे नसल्याचे निदर्शनास आले आहे. उरण नगर परिषदेने एमआयडीसीची थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल पावणेतेरा कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने एमआयडीसीने शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.उरण पालिकेची पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे नगरपरिषद एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करीत असते. एमआयडीसीने यासाठी तीन कनेक्शन दिले असून, सुमारे ३५ हजार शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, एमआयडीसीची १२ कोटी ७२ लाख ७४ हजार ४६५ इतकी पाणीपट्टीची रक्कम थकविली आहे. वारंवार सूचना, विनवण्या करूनही नगरपरिषदेकडून थकीत रकमेचा भरणा करण्यास चालढकलपणा करीत आहे. यामुळे एमआयडीसीने थकीत बिलाचा भरणा न केल्यास, १५ टक्के पाणीकपात करण्याच्या सूचना उनपला दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही थकीत रकमेचा भरणा करण्यात दिरंगाईच होत असल्याचा आरोप एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिला.याआधीच उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे साडेएकवीस कोटी रुपये थकबाकी आहे. त्यात आता उनपच्या सुमारे पावणेतेरा कोटींची भर पडली आहे. उनप आणि ग्रा.पं.कडे थकीत असलेल्या कोट्यवधींच्या रकमेमुळे मात्र एमआयडीसी आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची माहितीही आर. डी. बिरंजे यांनी दिली. तर एमआयडीसीच्या पाणीपट्टीच्या व्याजाची रक्कम सोडून थकबाकी असलेल्या रकमेचा भरणा करण्याचा प्रयत्न उनपकडून केला जात आहे. प्राप्त होत असलेल्या रकमेनुसार उनप एमआयडीसीकडे थकीत रकमेचा भरणा करीत असल्याची माहिती उनपचे प्रभारी मुख्याधिकारी संदीप खोमोणी यांनी दिली.
उरण नगरपरिषदेने थकवले पावणेतेरा कोटींचे पाणी बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:49 AM