उरणकरांना प्रतीक्षा ‘मोरा-मुंंबई रो-रो’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:04 PM2020-02-09T23:04:31+5:302020-02-09T23:31:55+5:30

केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा: दोन वर्षांपासून प्रस्ताव लालफितीत; ६५ कोटींचा खर्च अपेक्षित

uran people Waiting for the 'Mora-Mumbai Ro-Ro' | उरणकरांना प्रतीक्षा ‘मोरा-मुंंबई रो-रो’ची

उरणकरांना प्रतीक्षा ‘मोरा-मुंंबई रो-रो’ची

Next

मधुकर ठाकूर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : अवघ्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असणाऱ्या मांडवा-भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा येत्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यापाठोपाठ केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी लालफितीत अडकून पडलेल्या ६५ कोटी खर्चाची मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवाही मार्गी लागावी, अशी अपेक्षा उरणकरांकडून व्यक्त होऊ लागली आहे.


उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान अवघे नऊ किमी इतके सागरी अंतर आहे. मुंबईपासून जवळ आणि वाहतुकीस सोयीचे असल्याने या सागरी जलमार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. अर्धा-पाऊण तासात मुंबई गाठणे सहज शक्य होत असल्याने जलमार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये कामगाराचाही मोठा समावेश आहे.


सागरी मार्गावर मागील ७० वर्षांपासून प्रवासी वाहतूक करीत असलेल्या खासगी लॉन्चसाठी नेहमीच गर्दी असते. त्यामध्ये आता जेएनपीटी बंदर आणि या बंदरावर आधारित असलेल्या सीएफएस कंपन्यांची भर पडली आहे.
जेएनपीटी बंदर आणि बंदरावर आधारित सीएफएस कंपन्यांकडे विविध कामांसाठी येणाºया कामगारांची संख्या मोठी आहे. मुंबईहून जेएनपीटी बंदर परिसरात येणाºया कामगारांना येण्यासाठी ६०-७० किमी अंतर पार करावे लागते. यासाठी साडेतीन ते चार तास लागतात.


वाहतूककोंडी उद्भवल्यास आणखी जास्त वेळ लागतो. याशिवाय इंधनावरही अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यामुळे उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान खासगी प्रवासी लॉन्चसेवेवरील ताण कमी करण्यासाठी आणि वेळ, इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली.

महत्त्वाकांक्षी सागरमाला योजनेंतर्गत प्रकल्प
१उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात येणाºया आणि केंद्र सरकारच्या सागरमाला या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रकल्पाला राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून दोन वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.
२या रो-रो योजनेअंतर्गत २० ते ३० वाहन क्षमतेची वाहतूक करणाºया बोटींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कामगार, प्रवाशांना आपल्या वाहनांसह तासाभरात मुंबई गाठणे सहज शक्य होणार आहे.
३उरण-मोरा ते भाऊचा धक्का दरम्यान सुरू करण्यात येणाºया प्रस्तावित रो-रो सेवेमुळे वेळ, इंधनावर होणारा खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या मांडवा-भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा येत्या १७ फेब्रुवारीपासून सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी लालफितीत अडकून पडलेली ६५ कोटी खर्चाच्या योजनेची मोरा ते भाऊचा धक्का रो-रो सेवा सुरू होण्याची हजारो उरणकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.


केंद्र सरकारच्या सागरमाला या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पावर ६५ कोटी खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर सदर प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावाबाबत सातत्याने केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.
- सुधीर देवरे,
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड

Web Title: uran people Waiting for the 'Mora-Mumbai Ro-Ro'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.