एमएमआरडीएविरोधात उरणकरांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:46 AM2017-08-05T02:46:09+5:302017-08-05T02:46:09+5:30
एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
उरण : एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संध्याकाळी नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाने आपणे म्हणणे जोरदारपणे मांडत बिल्डरधार्जिण्या आराखड्याचा निषेध केला.
शिष्टमंडळ मंचाचे मार्गदर्शक चंद्रशेखर प्रभू, आ. मनोहर भोईर, उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, सुधाकर पाटील, संजय ठाकूर आदिंचा सहभाग होता. यावेळी आ. भोईर यांनी येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातून उरणच्या पूर्व भागातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. तत्पूर्वी आझाद मैदान सरकारविरोधी घोषणांनी दुमदुमले.
मंचावर उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, शैलेंद्र कांबळे, सुधाकर पाटील, भूषण पाटील, रुपेश पाटील, जॉन परेरा, भावना म्हात्रे आदिंनी सरकारच्या धोरणाचा निषेध करत बिल्डरधार्जिणा आराखडा रद्द करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेवून सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला आराखडा बनवावा, अशी मागणी केली. या आंदोलनात आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, आ. गावीत यांनी पाठिंबा दिला. तर माजी आ. विवेक पाटील उपस्थित न राहू शकल्याने पाठिंब्याचे पत्र दिले.
विधिमंडळात आ. धैर्यशील पाटील यांनी लक्षवेधी दाखल केली असून ती लवकरच पटलावर येईल. काल एका अन्य प्रकरणात सभागृहाचे कामकाज तहकूब झाले होते. उरण तालुक्यातून कामगार नेते श्याम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष ठाकूर, जीवन गावंड, विनोद म्हात्रे, पं. स. सदस्या शुभांगी पाटील, सुरेश पाटील, संतोष पवार, विलास गावंड, शेखर ठाकूर, विनायक मोकल, मेघनाथ मोकाशी, गुरुनाथ गावंड, संदीप पाटील, सुभाष कडू यांच्यासह गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व जनता आंदोलनात सहभागी झाली होती.