उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात पुन्हा एकदा वायुगळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:18 PM2019-09-25T23:18:10+5:302019-09-25T23:18:24+5:30
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; अधिकाऱ्यांच्या तत्परतेने अनर्थ टळला
उरण : येथील ओएनजीसीच्या एपीयू युनिटमधून सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायुगळती झाली. याच महिन्यात ३ सप्टेंबरमध्ये झालेल्या वायुगळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत ओएनजीसीच्या एका अधिकाºयासह चार कर्मचारी शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा झालेल्या वायुगळतीने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ओएनजीसी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून वेळीच उपाययोजना केल्याने दुर्घटना टळली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात बुधवारी (२५) एपीयू युनिटमधून सकाळी ७ वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायुगळतीला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. त्यामुळे वातावरण दूषित झाले. वाहत आलेल्या नाल्यात नाफ्ता जमा झाल्याने पुन्हा एकदा वायुगळतीमुळे भीषण आगीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र यावेळी तत्पर असलेल्या ओएनजीसी कर्मचाºयांनी नाल्यात जमा झालेल्या अत्यंत ज्वलनशील असलेल्या नाफ्त्याच्या थरावर फोमचा मारा करून आग लागणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे आगीची दुर्घटना टळली. मात्र पुन्हा एकदा वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडताना दिसत होते. दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून ओएनजीसीच्या सुरक्षारक्षक पोलिसांनी अप्पू गेटपासून समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. चार तासांच्या प्रयत्नानंतर वायुगळती आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, ओएनजीसीत वारंवार घडत असलेल्या वायुगळतीच्या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी ओएनजीसीच्या गेटवर धडक दिली. ओएनजीसीच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त के ला. गेटवरच गर्दी केल्याने वातावरण चिघळत होते. कोणतीही अप्रिय घटना घडण्याची वाट न पाहता उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी नागरिकांना शांत केले. मात्र ओएनजीसीत वारंवार होणाºया वायुगळतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. दूषित पाणी नाल्यावाटे समुद्रात गेल्याने माशांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
ओएनजीसीचे प्रकल्प अधिकारी नरेंद्र असिजा येऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी आवाहन केले. येत्या आठवडाभरात तातडीची बैठक बोलावून सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यात येतील. तसेच घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची हमी प्रकल्प अधिकारी नरेंद्र असिजा यांनी नागरिकांना दिली असल्याची माहिती वपोनि कुलकर्णी यांनी दिली. वायुगळती नियंत्रणात आली आहे. मात्र वायुगळतीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न अधिकारी करीत असल्याचे नरेंद्र असिजा यांनी सांगितले.