अलिबाग: महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के राजकीय आरक्षण देण्याबाबत विधेयक भाजप सरकारने लोकसभा, राज्यसभेत पास केले आहे. ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी ही होऊ घातलेल्या निवडणुकीपासून सरकारने लागू करावी अशी मागणी रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड श्रद्धा ठाकूर यांनी सरकारकडे केली आहे. तर महिलाना नुसते गाजर दाखवू नका असा आरोपही ऍड श्रद्धा ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केला आहे. महिला आरक्षणाची संकल्पना ही काँग्रेसने आधी मांडली असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
३३ टक्के राजकीय महिला आरक्षण विधेयकबाबत शुक्रवारी ६ ऑक्टोंबर रोजी अलिबाग येथे काँग्रेस भवनात अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या आदेशावरून रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा ऍड श्रद्धा ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. अलिबाग महिला तालुका अध्यक्षा सुजाता पाटील, रायगड जिल्हा चिटणीस नयना घरत, पूजा म्हात्रे, पद्मजा पाटील, ऍड प्रतीक्षा पाटील, अनुराधा म्हात्रे, मंगला पाटील, नवल घोले, विशाखा पाटील, प्रियांका पाटील या उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा, विधानसभेत महिलाना ३३ टक्के आरक्षण दिले आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र महिला आरक्षण हे पहिल्यांदा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज संस्थेमधून दिले आहे. लोकसभा, विधानसभा मध्ये दिलेले महिला आरक्षण विधेयक हे पास झाले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यास वेळ घेत आहे. महिलाना नुसते गाजर न दाखवता होऊ घातलेल्या आताच्या निवडणुकांपासून महिलाना आरक्षण लागू करावे अशी मागणी महिला काँग्रेस तर्फे करण्यात आलेली आहे. यावेळी मोदी यांनी निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने जनतेला आणि महिलाना दिली होती. मात्र ती सर्व निष्फळ ठरली आहेत. असा आरोपही करण्यात आला आहे.