नीरव मोदीचा 100 कोटींचा बंगला पाडण्यासाठी 30 किलो स्फोटके पेरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 10:23 AM2019-03-08T10:23:12+5:302019-03-08T10:30:42+5:30
मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ झाला आहे.
कोळगाव-किहीम : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावत परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्याअलिबागमधील आलिशान बंगल्याला आज स्फोटकांनी उडवून देण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली असून आजुबाजुच्या लोकांनाही हलविण्यात आले आहे.
मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीअंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी केला. तेव्हा जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही. परिणामी, तो डायनामाइट्सच्या माध्यमातून स्फोट घडवून जमीनदोस्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. डायनामाइट्स स्फोटांच्या बाबतचे संपूर्ण सुनियोजित नियोजन तज्ज्ञांच्या मदतीने करून शुक्रवारी हा बंगला जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झाले. कारवाईकरिता ५० तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. बंगल्याच्या विविध भागांत एकूण 110 डायनामाइट्स लावण्याचे काम गुरुवारी संध्याकाळीच पूर्ण झाले.
हा बंगला पाडण्यासाठी एकूण 30 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. बंगल्याच्या आजुबाजुच्या लोकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच वाहतुकही पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. या स्फोटाचा परिणाम 200 मीटर परिसरात जाणवणार आहे.
Maharashtra: Authorities continue demolition of PNB scam accused Nirav Modi's bungalow in Alibag, Raigad district. pic.twitter.com/Tyu5Anz1VQ
— ANI (@ANI) March 8, 2019
अलिबागमध्ये पोलीस बंदोबस्त
अलिबागच्या सागरकिनारापट्टीतील नीरव मोदीसारख्या धनिकाचा बंगला डायनामाइट्स स्फोटाद्वारे उद्ध्वस्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. यावेळी बघ्यांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन परिस्थिती निवारण यंत्रणेबरोबरच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल.
अनेक कोट्याधीशांचे अनधिकृत बंगले
नीरव मोदीसह मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत. या सर्व प्रकरणात अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नीरव मोदीच्या बंगल्याचाही समावेश आहे. तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामद्ये १ लाख रुपये दंडापासून ५ वर्षे कैद अशी शिक्षेची तरतूद आहे.