पोषण आहारात निकृष्ट तेलाचा वापर
By admin | Published: September 28, 2016 02:50 AM2016-09-28T02:50:29+5:302016-09-28T02:50:29+5:30
शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्जत तालुक्यामधील शाळांमध्ये निकृष्ट व मुदत संपलेल्या
- कांता हाबळे, नेरळ
शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्जत तालुक्यामधील शाळांमध्ये निकृष्ट व मुदत संपलेल्या तेलाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नेरळमधील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेतील व्यवस्थापन समितीने उघड केला आहे. अशा प्रकारे निकृष्ट, मुदत संपलेली तेलाची पाकिटे देऊन शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. या घटनेचा पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून नेरळ पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.
शालेय पोषण आहारावरून राज्यात अनेकदा वाद झाले आहेत. आता त्यात नेरळ उर्दू शाळेची भर पडली आहे. या शाळेत पुरवठा करण्यात आलेल्या तेलाच्या पाकिटांमध्ये २८ पैकी १८ पाकिटे ही मुदत संपलेली आढळून आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे काही मुले दगावली होती. कर्जतमधील खांडस हा आदिवासी भागही कुपोषणाच्या विळख्यात अडकला आहे. कुपोषण दूर व्हावे, यासाठी सरकारकडून राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र पोषण आहाराचा दर्जा आणि वाटपात घोळ होत असल्याची प्रकरणे वारंवार उघड होत आहे.
शाळेत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत असून याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय पोषण आहारासंदर्भात गटशिक्षण अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्याचा अहवाल जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना त्वरित पाठवण्यात येईल.
- एम. एन. म्हात्रे, गटविकास अधिकारी,
कर्जत पंचायत समिती
जिल्ह्यातील पोषण आहार योजनेवर समिती नेमून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी.
- युसूफ सय्यद, अध्यक्ष,
उर्दू शाळा व्यवस्थापन समिती, नेरळ