कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात वारे ग्रामपंचायतीतील अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली आहे. येथील दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. अंगणवाडी केंद्राच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांचे हाल होत आहेत. येथील वर्गखोलीतच पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस शेगडी लावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
वारे अंगणवाडी केंद्राची इमारत २८ वर्षे जुनी असून १९९१ मध्ये बांधण्यात आली आहे. केंद्रात गावातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. या शिवाय सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांचीही केंद्रामार्फत नियमित देखरेख केली जाते; परंतु इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने अवस्था बिकट झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात खिडक्या तुटल्याने पावसाचे पाणी आत शिरत असून, वर्गखोल्या ओल्या होत आहेत. दरवर्षी प्लॅस्टिकच्या साहाय्याने तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात.
अंगणवाडी समोर रहदारीचा रस्ता असल्याने अपघातांची शक्यताही नाकारता येत नाही. खेदाची बाब म्हणजे मुलांचा पोषण आहार शिजविण्यासाठी अन्य जागा नसल्याने केंद्रातच खिचडी शिजवली जाते. मुलांना खेळण्याच्या मोकळ्या जागेअभावी याच एकाच वर्गखोलीत खाद्यपदार्थ शिजवले जातात, तर त्याच खोलीत मुले शिक्षण घेत आहेत, खेळताना दिसतात. त्यामुळे काही अघटित घडले तर मोठी दुर्घटना घडू शकते. अशीच स्थिती तालुक्यातील इतर अंगणवाडी केंद्राचीही पाहावयास मिळत असून काही ठिकाणी मुलांना मंदिरात किंवा अन्य ठिकाणी बसविण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे.
नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत पोषण आहार शिजविण्याची व्यवस्था असली तरी २०-२५ वर्षे जुन्या इमारतीत पोषण आहार शिजविण्याकरिता स्वतंत्र जागा नसल्याने एकतर वर्गातच आहार शिजविला जातो किंवा सेविका आपल्या घरून पोषण आहार शिजवून आणत आहेत. या संदर्भात वारे अंगणवाडी सेविकेने स्थानिक ग्रामपंचायत तसेच वरिष्ठ कार्यालयास या संदर्भात निवेदनाद्वारे कळविले असून पोषण आहार शिजविण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून इमारतीची दुरुस्तीही तातडीने करावी, अशी विनंती केली आहे. शासन अंगणवाडी केंद्रासाठी स्मार्ट उपाययोजना राबवित असले तरी मूलभूत भौतिक सुविधांपासून मात्र येथील बालकांना वंचित ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्मार्ट अंगणवाडी
- शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून वर्षाभरापासून तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. त्याद्वारे अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कार्याची नोंद मुख्य कार्यालयात संकलित केली जाते. यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल अॅप वापरण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
- अॅपमध्ये कुटुंब व्यवस्थापन, दररोज पोषणभरण, गृहभेट, वाढीची देखरेख, घरपोहोच आहार, अपेक्षित कामाची यादी, अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन, मासिक प्रगतीचा अहवाल यादी, किशोरवयीन मुली, समुदाय आधारित कार्यक्रम इत्यादी बाबींचा समावेश असून अंगणवाडी सेविकेचा सर्व माहिती डेटा मोबाइल अॅपद्वारे मुख्य विभागात संकलित केला जात आहे.
अंगणवाडी केंद्राची इमारत २५ वर्षे जुनी असून ती नादुरुस्त झाली आहे. खिडक्या- दरवाजे तुटलेले आहेत. मुलांना खेळण्यासही मोकळी जागा नाही. पोषण आहार शिजवण्यास स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने वर्गातच शिजविले जाते. या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडे निवेदन दिले आहे.- रेखा म्हसे, अंगणवाडी सेविका
पूर्वी तालुक्यात बालवाडी केंद्र चालविले जायचे, त्याचे रूपांतर अंगणवाडी केंद्रात झाले आहे. बालवाडीच्या इमारतीत आहार शिजविण्यास वेगळी जागा नव्हती; परंतु नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये स्वतंत्र स्वयंपाकगृह बांधण्यात आले आहे. ज्या केंद्रात सुविधा नाही, त्यांना पोषण आहार वेगळ्या ठिकाणी शिजविण्यास सांगितले जाईल.- निशिगंधा भवाल, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास, आईसीडीएस अधिकारी, कर्जतकेंद्रांमार्फत विविध सुविधाच्कर्जत तालुक्यात एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून प्रकल्प १ व प्रकल्प २ मिळून एकूण ३४० अंगणवाडी केंद्रे चालविली जातात.च्या केंद्राद्वारे ० ते ६ वर्षे वयोगटाच्या मुलांना सामाजिक, भौतिक, शारीरिक, मानसिक, तसेच भावनिक विकासाचा पाया घालणे.च्बालमृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे त्याचप्रमाणे आरोग्य व बाल संगोपन कुटुंब नियोजन यांचे शिक्षण, याशिवाय मुलांना पूरक पोषण आहार, नियमित आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, अनौपचारिक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण पोषण व आरोग्यविषयी शिक्षण या सुविधा केंद्रामार्फत पुरविल्या जातात.