उद्घाटनापूर्वीच जिल्हा नियोजनच्या इमारतीचा वापर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:05 AM2018-12-24T05:05:29+5:302018-12-24T05:06:03+5:30
रायगड जिल्हा नियोजन भवनच्या इमारतीच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नसतानाच या इमारतीच्या वापराला सुरुवात करण्यात आली आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन भवनच्या इमारतीच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नसतानाच या इमारतीच्या वापराला सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागणारी मतदान यंत्रे ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांचे कार्यालयच निवडणूक विभागाने घेतल्याने उद्घाटनापूर्वीच नियोजन भवनच्या नव्या इमारतीचे दरवाजे उघडावे लागल्याचे बोलले जाते.
रायगड जिल्ह्यातील नियोजन विभागासाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नियोजन भवनची सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह, एक मिनी सभागृह, नियोजन भवनचे विस्तृत कार्यालय, यासह लिफ्टची सुविधा, वातानुकूलित यंत्रणा अशा पद्धतीने इमारत बांधून तयार झाली आहे.
जिल्हा नियोजन भवनच्या देखण्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ अद्यापही न मिळाल्यामुळे इमारतीचे अधिकृतरीत्या उद्घाटन होऊ शकलेले नाही. इमारतीचे उद्घाटन झाले नसल्याने गेले काही महिने ती वापराविनाच पडून आहे. इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करून जिल्ह्यातील जनतेसाठी ती सुुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, निवडणूक विभागाला जागेची कमतरता भासत होती, त्यामुळे त्यांना जुन्या कार्यालयाचा ताबा दिला आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले.
नव्या नियोजन भवनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री यांची वेळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागितली आहे. त्यांची वेळ मिळाल्यावर इमारतीचे उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यंत्रासह अन्य सामग्रीसाठी वापर
२०१९ मध्ये होणाºया लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. त्याची हाताळणी करणे, देखभाल करणे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील जागा कमी पडत आहे.
मतदान यंत्राची सुरक्षा ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे असल्याने निवडणूक विभाग जागेच्या शोधात होता. याच तळमजल्यावर जिल्हा नियोजन विभागाचे कार्यालय आहे. निवडणूक विभागाला ते सोयीस्कर असल्याने त्यांनी त्याची मागणी करून नियोजन विभागाचे कार्यालय रीतसर आपल्या ताब्यात घेतले आहे. आता त्या ठिकाणी मतदान यंत्रांसह अन्य सामग्री ठेवण्यात आली आहे.
निवडणूक विभागाने जिल्हा नियोजन विभागामध्ये आपला कारभार सुरू केल्याने नियोजन विभाग हा २६ नोव्हेंबर रोजीच उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नियोजन विभागाच्या नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाला आहे. त्या ठिकाणाहून आता जिल्ह्याच्या विकासाचा कारभार हाकण्यात सुरुवात करण्यात आली आहे.