- मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपासाठी सुरू असलेल्या १११ हेक्टर क्षेत्रातील भरावासाठी ठेकेदारांनी माती,मुरुम, दगडांऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा मोठ्या प्रमाणावर वापर करून सिडको -जेएनपीएला शेकडो कोटींचा चुना लावला आहे. ठेकेदारांकडून होणाऱ्या या फसवणूकीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडको-जेएनपीएला धारेवर धरुन भरावासाठी वापरण्यात आलेले टाकाऊ डेब्रिज काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे ठेकेदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सिडकोने जेएनपीए बंदरासाठी नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार,सोनारी, बेलपाडा,पाणजे,डोंगरी, फुडें आदी गावातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची २७०० हेक्टर जमीन संपादन केली आहे.संपादन केलेल्या जागेपोटी खातेदार असलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या १२००० वारसांना जेएनपीएने ३४ वर्षांनंतरही साडेबारा टक्के विकसित भुखंडाचे वाटप केलेले नाही.भुखंड वाटपासाठी १४५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.मात्र जेएनपीएने काही गावांना गावठाण विस्तारासाठी जमिन दिल्याचे कारण पुढे करून साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपासाठी फक्त १११ हेक्टर जमीन जमीन आरक्षित केली आहे.
जेएनपीएने साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप करण्यासाठी रांजणपाडा, जासई दरम्यान आरक्षित करण्यात आलेल्या १११ हेक्टर क्षेत्रावर भराव सुरू केला आहे . या कामासाठी ३७९ कोटी रुपये खर्चाची तरतूदही जेएनपीएने केल्यानंतर भरावयाचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र ठेकेदारांनी माती-मुरुम- दगडाच्या भरावाऐवजी चक्क मुंबई, नवीमुंबईतुन फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर केला आहे.हे टाकाऊ डेब्रिज फुकटात तर मिळतेच त्याशिवाय उलट एका डंपरमागे २००- ते ३०० रुपये डेब्रिज टाकणाऱ्यांकडून दिले जातात.
अशाप्रकारे ठेकेदारांनी एकीकडे सिडको-जेएनपीएकडुन भरावाचे तर दुसरीकडे फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर आणि त्यापोटी मिळणारे पैसे अशी दुहेरी कमाई करुन कोट्यावधी रुपयांचा चुना लावला आहे. सिडको-जेएनपीए फसवणुक करून कोटींवधींची कमाई केली आहे.ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर आणि याविरोधात जेएनपीए आणि संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींनंतर भरावाचे काम सिडकोने मे २०२३ पासूनच बंद केले असल्याची माहिती जेएनपीए कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी दिली.
टाकाऊ डेब्रिजचा भरावासाठी वापर केल्याने जेएनपीएने पुनर्वसन केलेल्या वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.टाकाऊ डेब्रिजच्या वापरामुळे ठेकेदार गब्बर होत असले तरी भरावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.याबाबत पुराव्यानिशी सिडकोकडे तक्रारी केल्या कारवाईची मागणी करण्यात आली असल्याची माहिती माजी जेएनपीए कामगार ट्र्स्टी भुषण पाटील यांनी दिली.