निर्माल्याचा सेंद्रिय खतासाठी उपयोग
By Admin | Published: September 26, 2015 01:02 AM2015-09-26T01:02:48+5:302015-09-26T01:02:48+5:30
शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ
पेण : शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ गणरायाच्या आगमनासह जागोजागी निर्माल्याचा मोठा खच पडतो. मात्र पेण शहर व ग्रामीण परिसरातील बहुतांश बाप्पांचे विसर्जन वाहत्या प्रवाही पाण्यात केले जाते. या विसर्जनस्थळावर सध्या पडणाऱ्या निर्माल्याच्या कचऱ्यामुळे जलप्रदूषण होऊ नये आणि पर्यावरणाची हानी टळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत येथे स्वच्छता केली जाते.
काही ठिकाणी सामाजिक स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे व आध्यात्मिक सांप्रदायाचे स्वयंसेवक यासाठी पुढाकार घेवून विसर्जनस्थळी व नदीतटावरील निर्माल्य उचलण्याची कार्यवाही गेल्या चार, पाच वर्षांपासून करीत असल्याने या संकलित केलेल्या निर्माल्याचा सेंद्रिय खत म्हणून जागोजागी उपयोग केला जात आहे. पेण शहरातील साई मंदिर कसार तलावात शहरातील बहुतांश घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.बाप्पाच्या विसर्जनासाठी पेण पालिकेने तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश बसवून निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.
विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी उभारलेल्या स्वागतकक्षातून गणेशभक्तांना निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र दीड,पाच आणि सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर गळ्यातील हार, फुले इतर पदार्थ पाण्यावर तरंगत होते. ते नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी काढून टाकत स्वच्छता केली. या तलावात पोहण्यासाठी लहानासह मोठमोठी मंडळी येत असल्याने या साईमंदिर परिसर व कासार तलावातील निर्माल्य काढून ते आंबेघर धामणी येथील सेंद्रिय खत बनविणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात आले.
ग्रामीण विभागात बहुतांश ठिकाणी नदी, नाले व समुद्र खाड्यातील वाहत्या प्रवाही पाण्यामध्ये बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने खाडीत टाकलेल्या निर्माल्य भरतीच्या पाण्याबरोबर वाहत समुद्राकडे जाते. खाडी व नदी तटावरील निर्माल्य त्या त्या ठिकाणच्या नेमलेल्या जागांवर टाकण्यात येते. याशिवाय गावोगावच्या सार्वजनिक तलावातील विसर्जनानंतरचे निर्माल्य संबंधित ग्रामपंचायतीमार्फत काढून स्वच्छ केले जाते. काही ठिकाणी या निर्माल्याचा उपयोग कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जातो.
सध्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल जनजागृती झाल्याने गावच्या स्वयंसेवी संस्था व युवा मंडळे याबाबीत दक्षता घेवून विसर्जनस्थळावरील अनावश्यक कचरा व निर्माल्य तातडीने उचलण्याची व्यवस्था करतात. यामुळे पाणी व परिसर स्वच्छ राहण्यात मदत मिळते. निर्माल्य ठरवून दिलेल्या जागेवर, तेथे असणाऱ्या स्वयंसेवकांच्या हाती दिले तर त्याची योग्य विल्हेवाट लागेल अशी भावना जागरु क नागरिकांनी व्यक्त केली.