प्राथमिक आरोग्य केंद्रात पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 01:24 AM2016-04-07T01:24:17+5:302016-04-07T01:24:17+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये ३० हजार ७५ रुग्णांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे.
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये ३० हजार ७५ रुग्णांनी वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत २४ तास सेवा दिली जात आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे.
बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आनंद जोगदंड यांनी आॅक्टोबर २०१५ नंतर राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर न केल्याने या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी फक्त कागदावर असून प्रत्यक्षात गेल्या पाच महिन्यांपासून डॉ. बिराजदार हे २४ तास रुग्णसेवा देत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १ वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. मुख्यालय आरोग्यसेविका हे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. मलेरिया पर्यवेक्षक, शिपाई, पुरुष-स्त्री त्याचप्रमाणे वाळण बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक हे पद रिक्त आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत २०१५ ते २०१६ या कालावधीत ३० हजार ७५ रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे, तर अंतर रुग्ण १ हजार ३१९, प्रसूती १२६, सर्पदंश ३७, विंचूदंश २४५, श्वानदंश ३२२, इतर ३३, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया १७१, शवविच्छेदन ३२ आणि एमएलसी २१८ अशी आकडेवारी समोर आली आहे.
बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची एकूण आकडेवारी लक्षात घेऊन कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यासाठी महाडचे आ. भरत गोगावले, राजिप विरोधी पक्षनेते सूर्यकांत कालगुडे यांनी लक्ष घालावे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.