जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:50 AM2020-07-27T00:50:16+5:302020-07-27T00:50:19+5:30

सतीश माने यांची माहिती : जिल्हा शल्यचिकित्सक यांचा श्रीवर्धन दौरा

Vacancies will be filled in the district hospital | जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरणार

जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीवर्धन : तालुक्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश माने यांनी रविवारी श्रीवर्धन दौरा केला.
यावेळी जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरण्याविषयी कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले, तसेच उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. आठवड्यातील एक दिवस गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टर्स माणगाव येथून श्रीवर्धनला पाठवले जाणार आहेत, असे डॉ. सतीश माने यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयातील मध्यवर्ती आॅक्सिजन केंद्राची पाहणी करण्यात आली, तसेच रुग्णालयातील रिक्त पदाविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती घेतली. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आजमितीस वैद्यकीय अधिकारी २, कक्ष सेवक २, शिपाई दोन, औषध निर्माण अधिकारी २, सफाई कामगार एक असे विविध पदे रिक्त आहेत. २००४ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू बांधण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. ४ जुलै, २०२० रोजी रोहा येथे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद गवई, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या बैठकीत रायगड जिल्ह्यातील विविध भागांत रुग्णवाहिका उपलब्ध करण्याविषयी चर्चा झाली. त्यानुसार, १९ जुलै, २०२०ला श्रीवर्धनमध्ये दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे माने यांनी स्पष्ट केले.
श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश माने, वैद्यकीय अधिकारी महेंद्र भरणे, मयूर हडगे मोहम्मद अली यांच्यात श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत चर्चा झाली.

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोईसुविधा पुरवल्या जातील. गर्भवती स्त्रियांसाठी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध केली जाईल. कोरोना पार्श्वभूमीवर आजचा दौरा आयोजित केला आहे. आरोग्य प्रशासन दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
- सतीश माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

खा.सुनील तटकरे यांनी रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी तत्काळ संवाद साधला जाईल. मी श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाविषयी सजग आहे. आरोग्यविषयक बाबींचा तत्काळ पाठपुरवठा करण्यात येत आहे.
- अनिकेत तटकरे, आमदार

उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विषयक सेवा-सुविधांच्या त्रुटीविषयी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संवाद साधून, या बाबी त्यांच्या निदर्शनास आणूना दिल्या आहेत.
- दर्शन विचारे, राष्ट्रवादी
तालुका अध्यक्ष, श्रीवर्धन

Web Title: Vacancies will be filled in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.