जिल्ह्यात १ लाख ६५ हजार जनावरांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:30 AM2018-08-29T05:30:31+5:302018-08-29T05:30:56+5:30
पशुधन वाचविण्याचा प्रयत्न : जिल्हा पशुसंवर्धन विभागाची मोहीम
आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पशुधनात घट होत आहे. कृषी क्षेत्रावर आधारित व्यवसायांवर याचा विपरीत परिणाम होत आहे तर दुसरीकडे विविध आजारांची लागण होत असल्याने जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यावर वेळीच उपाययोजना करून पशुधन वाचवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तब्बल एक लाख ६५ हजार १९१ जनावरांचे लसीकरण केले आहे.
पावसाळ्यात गाय, म्हैस, बैल व शेळ्या, मेंढ्या अशा अनेक पाळीव प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याची भीती असते. आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. एकूण एक लाख ६५ हजार १९१ जनावरांचे लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश लाळगे यांनी दिली. पावसाळ्यात पाळीव जनावरांना घटसर्प, फेऱ्या, आत्र विषारी, लाळ खुरकूत असे रोग निर्माण होतात. त्यात घटसर्प हा जनावरांना, प्राण्यांना, तसेच दुधाळ जनावरांना होणारा रोग आहे. विशेषत: म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. हा रोग ‘पाश्चुरेला मल्टोसिडा’ या विषाणूंमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात.
रोगी जनावराच्या नाकातोंडातून वाहणाºया स्त्रावामुळे व दूषित चाºयाद्वारे हा रोग पसरतो. या रोगामुळे जनावरांना ताप येतो. घशास सूज येते. श्वासोच्छवास जलद रीतीने होतो. जनावराचे डोळे लाल होतात. ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. काही वेळेस जनावरांना रक्ताची हागवण होते व अंगावर सूज येते.
लाळ अथवा खुरकूत हा रोग लहान-मोठ्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढरे यांना होतो. यात ताप, लाळ गळणे, तोंडात व जिभेवर चट्टे पडणे; शिंगे व खूर गरम होणे व पायांच्या दोन्ही नख्यांमधील जागेत फोड येऊन फुटणे व जनावर लंगडणे वगैरे रोग होतात. या रोगात जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. फेºया हा रोग वयाने लहान व सशक्त अशा गुरांना होतो. हा रोग फार घातक असून या रोगाने पछाडलेले जनावर एक दोन दिवसांत मरते. यात ताप येतो, जनावर सुस्त होते. आत्र विषारी हा रोग शेळ्या, मेंंढ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. आत्र विषारी आजारामुळे जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. रायगड जिल्ह्यातील गाय, म्हैस, रेडा, बैल, शेळ्या, मेंढ्यांना अशा प्रकारचे रोग होऊ नये, तसेच या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी जनावरांंचे लसीकरण करण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे तीन लाख गाय, बैल आणि म्हशींची संख्या आहे. सर्वच शेतकरी जनावरांना लसीकरणासाठी नेत नाहीत. त्यांच्यावर जबरदस्तीही करू शकत नाही. पशुवैद्यकीय अधिकारी गावागावात भेट देत असून अधिकाधिक शेतकºयांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. राजेश लाळगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी