- जयंत धुळप अलिबाग : भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबर पासून गोवर, रुबेला लसीकरण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील एकूण ७ लाख ९३ हजार ४५१ बालकांपैकी १७ टक्के म्हणजे १ लाख ३६ हजार २६२ बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त अहवालानुसार शुक्रवार, ३० नोव्हेंबर या एका दिवसात जिल्ह्यातील ३२० शाळांमध्ये लसीकरण मोहीम पूर्ण झाली आहे. यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील ५३ शाळांमधील ८ हजार ५९० तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील २६७ शाळांमधील २५ हजार ३०३ विद्यार्थ्यांना अशा एकूण ३३ हजार ८९३ विद्यार्थ्यांचे लसीकरण एका दिवसांत करण्यात आले. मोहिमेच्या चार दिवसांत लसीकरण करण्यात आलेल्या एकूण १ लाख ३६ हजार २६२ विद्यार्थ्यांमध्ये ७१ हजार ४५३ मुले व ६४ हजार ८०९ मुलींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिली आहे.९ हजार ६४० लसीकरण सत्रात होणार लसीकरण. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक या दोन्ही आरोग्य यंत्रणांमार्फत हे अभियान अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अलिबाग, उरण, पनवेल, महाड, कर्जत, पेण, रोहा, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली, माथेरान या शहरी भागाच्या कार्यक्षेत्रातील १ लाख ८७ हजार ३७८ बालकांना तर ग्रामीण भागातील ६ लाख ६ हजार २०६ बालकांना अशा एकूण ७ लाख ९३ हजार ४५१ बालकांना एकूण ९ हजार ६४० लसीकरण सत्रात लसीकरण केले जाणार आहे.पहिला टप्प्यात जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ११ डिसेंबरपासून बाह्यसत्रात शाळांव्यतिरिक्त अन्य बालकांपर्यंत ही लसीकरण मोहीम पोहोचणार आहे.
जिल्ह्यात १ लाख ३६ हजार बालकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:12 AM