रायगड : जिल्ह्यातील ४०० आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लस देण्याचे नियाेजन करण्यात आले हाेते. मात्र, २६३ जणांनीच प्रत्यक्षात लस टाेचून घेतली आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे काेराेना लस टाेचून घेतलेल्यांपैकी एकालाही काेणताच त्रास जाणवला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुहास माने यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.काेराेना लसीकरणाला देशभरासह रायगड जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ४०० आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लस टाेचण्याचे नियाेजन हाेते. यासाठी अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालय (१००), पेण येथील उपजिल्हा रुग्णालय (१००) आणि पनवेल तालुक्यातील एमजीएम (१००), जी. डी. पाेळ फाउंडेशन (१००) या ठिकाणी एकूण ४०० जणांना लसीकरण करण्यात येणार हाेते. प्रत्यक्षात अलिबागला २७ जणांनीच लस टाेचून घेतली, तर पेण येथे २१ , पनवेल येथे ९५ जणांनी लस टाेचून घेतली. काेविशिल्ड लसीबाबत साशंकता असल्याने ‘आधी तुम्ही घ्या, नंतर आम्ही घेताे’, अशी मानसिकता असल्याने टार्गेट पूर्ण हाेऊ शकले नाही. त्याचप्रमाणे सर्व्हर डाऊन हाेत असल्याने अडथळा येत हाेता. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने नावे नाेंदवून लस देण्यात आल्याचे डाॅ. माने यांनी स्पष्ट केले. आता २८ दिवसांनी यांना पुन्हा लस टाेचण्यात येणार आहे. काेणालाही लस टाेचल्याने त्रास झाला नाही, असेही डाॅ. माने यांनी स्पष्ट केले. लस सुरक्षित आहे, काेणीही भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले.त्याचप्रमाणे सर्व्हर डाऊन हाेत असल्याने अडथळा येत हाेता.
पालघरमध्ये ४०० पैकी २९३ कोरोनायोद्ध्यांना लसीकरण- पालघर : पालघरच्या जे. जे. युनिट रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. एकूण ४०० लसींपैकी फक्त २९३ कोरोनायोद्ध्यांवर लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. - जिल्ह्यात चार लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. त्यात प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी १०० अशा ४०० कोरोनायोद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार होते. त्यापैकी पालघर ग्रामीण रुग्णालयात ७०, उपजिल्हा रुग्णालय जव्हार ६१, उपजिल्हा रुग्णालय डहाणू १००, वसई-विरार महानगरपालिकेअंतर्गत वरुण इंडस्ट्रीज केंद्रात ६२ अशा चार केंद्रांवर एकूण २९३ कोरोनायोद्ध्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी दिली.
दर दिवशी फक्त १०० लाभार्थ्यांना करण्यात येणार लसीकरण - ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शनिवारी झाला. जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा सन्मान जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना मिळाला. - लसीकरणाच्या पहिल्या दिवशी २३ केंद्रांवर एक हजार ८२६ आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.- प्रत्येक दिवशी फक्त १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सायंकाळी पाच पर्यंत १ हजार ८२६ आरोग्यसेवकांना लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण ७९.३९ टक्के आहे. - ठाणे मनपाच्या ४ केंद्रांवर ३५३, कल्याण डोंबिवलीच्या ३ केंद्रांवर ३००, मीरा भाईंदरमध्ये ३ केंद्रांवर २६८, नवी मुंबईच्या ४ केंद्रांवर ३०३, भिवंडीतील ३ केंद्रांवर १८४, उल्हासनगरमध्ये १ केंद्रात ७१, ठाणे ग्रामीणच्या ५ केंद्रांवर ३४७ आरोग्यसेवकांना लस देण्यात आली अशी माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ चौधरी यांनी दिली.