रायगड जिल्ह्यात पाच केंद्रांवर 359 जणांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:36 AM2021-05-02T00:36:52+5:302021-05-02T00:37:10+5:30
१८ ते ४४ वयोगटातील ४०० जणांचे होते उद्दिष्ट : पनवेलमध्ये २५८, पेणमध्ये ५९, अलिबागमधील ४२ नागरिकांनी घेतली लस
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ ते ४४ वर्ष वयाेगटातील नागरिकांना १ मे राेजी लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पनवेल येथे तीन केंद्रांवर, अलिबाग येथील एक, पेण येथील एका केंद्रावर लसीकरण सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.
लवकरच अजून एका केंद्राची वाढ केली जाणार आहे. सरकारने सध्या पाचच केंद्रे सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काेराेनाला हद्दपार करण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. ४५ ते ६० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे केली हाेती. माेदी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत परवानगी दिली हाेती. त्यानुसार राज्यात १८ ते ४४ वर्ष वयाेगटातील नागरिकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरू हाेईल, असेही सरकारने सांगितले हाेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात ते आज सुरू झाले. १० हजार काेराेना लसींचा साठा जिल्ह्यासाठी नव्याने प्राप्त झाला आहे. लसीकरणासाठी नाेंदणी करणे अनिवार्य आहे. ज्यांनी नाेंदणी केली आहे त्यांनाच लस टाेचली जाणार असल्याचे चाैधरी यांनी स्पष्ट केले.
पनवेलमध्ये तीन केंद्रांवर लसीकरण
कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक
नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मर्यादित मात्रा शनिवारी १.०० वाजता मिळाल्या. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तत्काळ नियोजन करण्यात आले. शनिवारी महापालिकेच्या ३ लसीकरण केंद्रांवर २५८ जणांचे लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्या तरी लसीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ३ नवीन पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५ खारघर या प्राधमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन ॲपवर नोंदणी करून त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित करतील अशा व्यक्तींना त्या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे.