विजय मांडे -कर्जत : कर्जत शहरात लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असताना ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू करून पावणेतीन हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. या केंद्रांवर कोविशिल्ड लस देण्यात येत असून ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे.कर्जत तालुक्यात एकूण ३८ आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र २२ आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य समुदाय अधिकारी असल्याने त्या केंद्रांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. या आरोग्य उपकेंद्रांसाठी दोन हजार ७५० कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्याने त्या - त्या भागातील लोकांचे लसीकरण झाले. या केंद्रांवर ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.कर्जत शहरात एकच लसीकरण केंद्र आहे. त्या लसीकरणाचा दोन दिवसांपासून गोंधळ सुरू होता. कर्जत उपजिल्हा केंद्रांवर असलेले लसीकरण केंद्र कोविड सेंटर असल्याने १ मे पासून बंद केले होते. त्यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी वणवण सुरू झाली. दरम्यान अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर शाळेमध्ये गुरुवारी सुरू झालेले लसीकरण जेमतेम दोन दिवस सुरू ठेवून बंद झाले. आणि पुन्हा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू केले. मग डेडिकेटेड कोविड सेंटर आता अडचण ठरत नाही काय? असा प्रश्नआहे.शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील लोकांना चांगली सुविधा मिळाली आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य, शिक्षण व क्रीडा सभापती सुधाकर परशुराम घारे यांचे प्रयत्न कामी आले. काही भागात दोन - अडीच किमीरवर केंद्र असल्याने त्या परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत. मोहिली आरोग्य केंद्रापासून खांडपे अडीच किलोमीटरवर आहे. आता या केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीची प्रतीक्षा आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य उप केंद्रांना लसीकरणाची परवानगी दिल्याने त्या - त्या भागातील लोकांना लसीकरण करणे सोयीचे झाले आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविशिल्ड लस देण्यात येते. पुढील आदेश मिळाल्यानंतर १८ ते ४४ वर्षांच्या व्यक्तींना लसीकरण करता येईल.' - डॉ. सी. पी. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत