लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : श्रीवर्धन तालुक्यामध्ये कोरोनास्थिती गंभीर आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दर दिवशी रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेले लसीकरण बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात साठा संपल्याने बंद आहे.
दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या संचारबंदी सोबत अत्यावश्यक सेवेमध्येदेखील वेळेचे बंधन ठेवून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. मात्र, विविध ठिकाणी जनतेकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. येथील प्रमुख शहरातील बाजार रस्ते व इतर परिसरात लोकांनी अवाजवी गर्दी केल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. मात्र, त्याचे गांभीर्य लक्षात न घेता लोक रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष करीत नागरिक बिनदिक्कतपणे रस्त्यावर फिरत असल्यामुळे तालुका प्रशासनाकडून सहकार्याची मागणी होत आहे.
गेल्या दोन दिवसांत बागमांडला व आरावी येथील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अगोदरच आरोग्य कर्मचाऱ्यांचा वानवा आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मार्चपासून लसीकरण सुरू झाले होते. आजपर्यंत एकूण १२२६ डोस येथे देण्यात आले. पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील ४४० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ एप्रिल रोजी सुरुवात करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठांसह ४५ वयोगटावरील नागरिकांना लस देण्याचे सुरू असताना मंगळवारी उर्वरित ५० लस आलेल्या नागरिकांना देण्यात आल्या. मात्र, लसींचा साठा संपल्याने लसीकरण होणार कसे, असा प्रश्न पडला आहे.
श्रीवर्धनमध्ये वाढती रुग्णसंख्यामंगळवार २० एप्रिल रोजी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तालुक्यात ७ रुग्णांची वाढ झाली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बापवली १, बोर्लीपंचतन ३, वडघर १, सर्वे १, तर श्रीवर्धन शहर येथील १ रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील मंगळवारी मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार ७ रुग्ण संख्या वाढली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१८ झाली आहे. यातील २६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होऊन दगावले आहेत; तर ५१२ रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. सध्या ८० रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यातील लसीकरण ठप्पबोर्लीपंचतन, आदगाव याशिवाय वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातही लसींचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. यामध्ये अनेकांना लस संपल्यामुळे माघारी परतावे लागते आहे.