मनसेची खड्डे मोजा स्पर्धा : वडखळ ते पळस्पे महामार्गावर १५,९१० खड्डे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:58 AM2019-08-01T01:58:06+5:302019-08-01T01:58:10+5:30
मनसेची खड्डे मोजा स्पर्धा : २५ आॅगस्टपर्यत दुरस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा
वडखळ/ नागोठणे : मुंबई-गोवा महामार्ग सध्या खड्डेमय झाला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोवर्धन पोलसानी यांनी बुधवारी महामार्गाच्या वडखळ ते पळस्पे या मार्गात खड्डे मोजण्याची स्पर्धा आयोजित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ ते पळस्पेपर्यंत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अडीच फूट खोल खड्डे पडले आहेत. महामार्गावर १५,९१० खड्डे पडले आसल्याचे गोवर्धन पोलसानी यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हासंघटक गोवर्धन पोलसानी, मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, वाहतूक सेनेचे सरचिटणीस राहुल चव्हाण, विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष शालोम पेणकर, मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष देवव्रत पाटील आदीसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी वडखळ येथे राष्ट्रीय महामार्गचे अभियंता नागराज राव यांनी आंदोलनकांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या महामार्गावर पहिल्याच पावसात सालाबादप्रमाणे छोटे-छोटे, मोठे-मोठे, गोल-गोल, मस्त-मस्त, छान-छान, त्रिकोणी, चौकोनी, काटकोनी आकाराचे खड्डे पडून या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना हवाई सफर केल्याचा अनुभव येत आहे. तर या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तसेच कित्येकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे आपले, राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वडखळ नाका येथे खड्डे मोजा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ ते पळस्पेपर्यंत महामार्गावर १५,९१० खड्डे पडले असल्याचे गोवर्धन पोलसानी यांनी सांगितले. २५ आॅगस्टपर्यंत खड्डे भरले नाहीत तर मनसे स्टाइलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना याच खड्ड्यात बुडविले जाईल, असा इशारा मनसेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी दिला.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यामध्ये पेव्हर ब्लॉक बसविले जातील व पाऊस थांबल्यावर डांबरीकरण करण्यात येईल. २५ आॅगस्टपर्यंत सर्व खड्डे भरले जातील.
- नागराज राव, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग