वडखळ एस टी स्थानक अस्वच्छतेने ग्रासले, प्रवासी करत आहेत उघड्यावर लघुशंका
By राजेश भोस्तेकर | Published: August 16, 2023 07:24 PM2023-08-16T19:24:30+5:302023-08-16T19:24:46+5:30
वाहतूक विभागाचे मात्र दुर्लक्ष
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: वडखळ एस टी स्थानक हे विविध समस्येने ग्रासले आहे. स्थानकात प्रवाशांना स्वच्छतागृहाचीही सुविधा नसल्याने उघड्यावर लघुशंका करण्याची वेळ आली आहे. स्थानकातील या आणि इतर असुविधेबाबात वाहतूक विभागाकडूनही दुर्लक्ष होत आहे. स्थानकातील सोयी सुविधासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्यवृती एस टी स्थानक आहे. मुंबई, ठाणे येथून जिल्ह्यात तसेच कोकणात जाणाऱ्या एस टी बसेस वडखळ स्थानकातून जात असतात. एकेकाळी वडखळ बस स्थानक हे सोयी सुविधा युक्त होते. मात्र काही वर्षांपासून या स्थानकाची दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
वडखळ स्थानकात स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. मात्र गेली अनेक वर्षापासून या स्वच्छतागृहाची स्वच्छता केली गेलेली नाही आहे. मुंबई, ठाणे मार्गावरून कोकण कडे जाणाऱ्या बसेस थांबल्यानंतर प्रवासी हे लघु शंकेसाठी उतरतात. मात्र स्थानकात असलेले स्वच्छतागृह हे अस्वच्छ असल्याने ते वापरण्यास अयोग्य झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना बाजूला उघड्यावर उभे राहून लघु शंका करावी लागत आहे. पुरुष हा आड बाजूला जाऊन हे करू शकतो. महिला प्रवासी यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.
स्थानकाचा परिसर ही अस्वच्छ असून प्रवाशांना बसण्यासाठीही असलेली जागा अस्वच्छ आहे. स्थानक परिसर हा खड्डेमय झाला असून पावसाळ्यात पाणी साचल्याने पाण्यातून प्रवाशांना बस पकडावी लागत आहे. उघड्यावर लघु शंका प्रवासी करीत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र स्थानकाच्या या दुरावस्थेकडे पाहण्यास जिल्हा वाहतूक विभाग प्रशासनाला वेळ नाही का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकीकडे स्थानक स्वच्छता स्पर्धा परिवहन मंडळ तर्फे सुरू असताना वडखळ स्थानक कधी स्वच्छ होणार याकडे लक्ष लागले आहे.