अलिबाग : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी अलिबागमध्ये आणण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सजवलेल्या मंडपामध्ये कलश ठेवण्यात आला. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसह नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन भारताच्या महान नेत्याला आदरांजली वाहिली.माजी पंतप्रधान यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दिल्लीमध्ये निधन झाले, त्यामुळे देश शोकसागरात बुडाला होता. सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. वाजपेयी यांच्या कार्यशैलीने देशासह आंतरराष्ट्रीय राजकारणात छाप पाडली होती. देशातील नागरिकांना त्यांच्या अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी त्यांचा अस्थिकलश प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आला. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतून अस्थिकलश आणून ते प्रत्येक जिल्हाध्यक्षांच्या स्वाधीन केले.अलिबाग येथे दुपारी १२च्या सुमारास वाजपेयींचा अस्थिकलश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणला. शहरातील शिवाजी चौकातील काशी विश्वेश्वर मंदिराच्या समोर मंडप उभारण्यात आला होता. याठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश आणि फोटो ठेवण्यात आला होता.रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे, यासाठी रोहे, मुरु ड, पाली, म्हसळा, महाड अशा विविध ठिकाणी अस्थिकलश नेण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग-मुरु ड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता महाडच्या सावित्री नदीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
अलिबागमध्ये वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:49 AM