अलिबाग : तालुक्यातील झिराड येथील गायखडा आदिवासीवाडी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोेईर यांच्या पुढाकाराने आता प्रकाशमय होणार आहे. या आदिवासीवाडीमध्ये झिराड ग्रामपंचायतीच्या वतीने पथदिवे लावण्यात येणार असून, या कामाचे शनिवारी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.ही आदिवासीवाडी डोंगराच्या मध्यावर आहे. या आदिवासी घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी विविध योजना राबविल्या. वैयक्तिक योजनाही येथील आदिवासी बांधवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या एक पाऊल पुढे जात, त्यांनी गायखडा आदिवासीवाडीचा कायापालट केला. ग्रामस्थांना स्वच्छेतेचे महत्त्व समजावे, तसेच पर्यावरणाचा समतोल राखावा, यासाठी या आदिवासीवाड्यांमध्ये कापडी पिशवी व बादली भेट देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. झिराडपासून ही आदिवासीवाडी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असून, या ठिकाणी सौरदिवे पोहोचविण्याचे काम भोईर यांनी केले. या वेळी उपसरपंच, सर्व सदस्य आदी उपस्थित होते.
गायखडा आ.वाडी होणार प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:56 AM