अलिबाग : भोर-महाड-वरंध घाट या मार्गावर राजेवाडी-वाघजाई मंदिर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्ता खचला असल्याने हा घाट ३१ ऑगस्टपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अधिसूचना जारी केली आहे.
महाड तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगर रांगामधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड, झाडे भोर-महाड- वरंध महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या मार्गावर राजेवाडी-वाघजाई मंदिर येथे अतिवृष्टीने दरड कोसळली आहे. त्यामुळे वरंध घाटातून प्रवास धोकादायक झाला असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जावळे यांनी जारी केली आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी नागरिकांनी महाड-माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे या मार्गाचा वापरावा. तर, कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा- पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड कोल्हापूर, असा पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.