अयोध्येतील श्रीरामांसाठी रायगड जिल्ह्यात आज विविध धार्मिक कार्यक्रम
By निखिल म्हात्रे | Published: January 21, 2024 06:50 PM2024-01-21T18:50:01+5:302024-01-21T18:51:35+5:30
श्रीरामाचे झेंडे फडकत असून संपूर्ण रायगड जिल्हा श्रीराम मंदिर उद्घाटन सोहोळा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अलिबाग - अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मूर्ती प्रतिष्ठानेनिमित्त रायगड जिल्ह्यात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चार हजार मंदिरांची स्वच्छता करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावागावांतील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात आली असून भजन, कीर्तन, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर घर, कार्यालये, वाहनांवर श्रीरामाचे झेंडे फडकत असून संपूर्ण रायगड जिल्हा श्रीराम मंदिर उद्घाटन सोहोळा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.
शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोमवारी (22 जानेवारी) होत आहे. काही दिवसांपासूनच सोहळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक मंदिरांची साफसफाई तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शोभायात्रा व मिरवणूक काढून अयोध्येतून आणलेल्या अक्षता यात्रेचे जल्लोषात स्वागत करून घरोघरी कार्यक्रमांचे निमंत्रणही देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील चार हजार १४८ मंदिरांमध्ये प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. यातील १७७ राम मंदिरांची स्वच्छता करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिरे उजळली आहेत. ग्रामीण भागातही मंदिर तसेच लगतचा परिसर स्वच्छता करण्यात आला आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही भक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मंदिरांमध्ये तसेच चौकाचौकात श्रीरामाची भजने, गीते कानी पडत आहेत. टाळ मृदंगाच्या गजरात भजन, कीर्तन रंगत आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बाजारपेठही श्रीराममय झाल्या आहेत. मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग तसेच कमानी लावण्यात आल्या आहेत. भगवे झेंडे तसेच जय श्रीराम लिहिलेल्या ध्वजांना मोठी मागणी आहे.