वसई-विरारची जलवाहिनी पडणार?
By admin | Published: August 19, 2015 11:46 PM2015-08-19T23:46:59+5:302015-08-19T23:46:59+5:30
सूर्या नदीतून वसई-विरार महानगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ज्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डोंगरभागातून ही जलवाहिनी जाते,
आरिफ पटेल, मनोर
सूर्या नदीतून वसई-विरार महानगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, ज्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या डोंगरभागातून ही जलवाहिनी जाते, तो भाग दरड कोसळण्याच्या घटनांमुळे खचू लागला आहे. महामार्ग सहापदरीकरण करण्याची योजनापूर्ती करताना डोंगरच पोखरून काढल्याने त्यालगत असणारी जलवाहिनी तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी ढेकाळे गावाच्या हद्दीत वाघोबा घाटात वन विभागाचा डोंगर आयआरबी कंपनीच्या ठेकेदारांनी पोखरलेला आहे. त्यामुळे दररोज जलवाहिनी असलेल्या भागात संथगतीने दरडी कोसळत आहेत. त्या डोंगरावरून वसई-विरार उपप्रदेशासाठी मोठी जलवाहिनी गेलेली आहे. याद्वारे पालघर तालुक्यातील दहिसर, नावझे, खांबलोली अशा ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा केला जातो. रस्त्याच्या कामासाठी पोखरलेल्या डोंगरावर असलेली जलवाहिनी खाली पडण्याच्या मार्गावर आहे. जलवाहिनी कोसळली तर या भागात मोठी दुर्घटना घडेलच, शिवाय पाणीपुरवठा बंद होऊन वसई-विरार तसेच पालघर तालुक्यातील लोकांचे प्रचंड हाल होतील. याचा विचार करून उपाय होणे गरजेचे आहे.