मताचं दान करा म्हणत वासुदेवांनी केले मतदानाचे अवाहन
By वैभव गायकर | Published: May 10, 2024 03:35 PM2024-05-10T15:35:13+5:302024-05-10T15:36:44+5:30
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबविला आहे.
पनवेल: सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबविला असून ‘मताचं दान करा’ म्हणत चारही प्रभागामध्ये वासुदेव मतदान जनजागृती करत आहेत. येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पनवेल महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे.
आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनूसार नुकतेच महापालिकेने लोक परंपरेतील ‘वासुदेवाच्या’ माध्यमातून चारही प्रभागामध्ये नागरिकांमध्ये मतदानबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याबरोबर 33 मावळ लोकसभा मतदारसंघामधील 188 पनवेल विधानसभा मतदार संघांत आशा सेविका बैठका घेऊन व घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करत आहेत. तसेच चारही प्रभागामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाजारपेठांमध्ये ,व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाऊन मतदान जनजागृतीपर पत्रकाचे वाटप करत आहेत.