कर्जतमधील वावे बेंडसे पूल प्रगतिपथावर विजय मांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:53 AM2018-04-03T06:53:31+5:302018-04-03T06:53:31+5:30
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता.
कर्जत - कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नदीवर पूल बांधल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
बेंडसे गावातील लोकांना हाकेच्या अंतरावरील भिवपुरी रेल्वेस्थानक आहे. मात्र याठिकाणी पोहचण्याकरिता मोठा वळसा घालावा लागे. विशेषत: विद्यार्थी आणि नोकरदार लोकांना पावसाळ्यात वावे किंवा भिवपुरी स्थानकात जाण्याकरिता तारेवरील कसरत करावी लागायची.
ग्रामस्थांनी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी उल्हास नदीमध्ये दोन्ही तीर जोडण्यासाठी लोखंडी तार बांधली होती. त्या तारेवरून ते सर्व नदी पार करायचे. पावसाळ्यात नदीच्या पात्रात दुथडी भरून वाहत असताना विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री सांभाळत तारेवरून जावे लागे. अनेक तरु ण तोल जाऊन नदीत पडण्याचे प्रकारही घडले आहेत.
उल्हास नदीवरील बेंडसे-वावे गाव जोडणारा पूल बांधावा म्हणून वर्षानुवर्षे ग्रामस्थांची मागणी होती. २०१६ मध्ये त्या ७० मीटर लांबीच्या पुलासाठी शासनाने तब्बल १ कोटी ८२ लाखांची तरतूद केली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुलाच्या कामाची सुरुवात आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते झाली होती.
वर्षभरात या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी उल्हास नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ बेंडसे आणि वावे ही गावे जोडली जाणार नसून गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा पूल मैलाचा दगड ठरणार आहे. पुलाच्या निर्मितीमुळे या भागातील लोकांची येण्या-जाण्याची सोय होणार आहेच शिवाय शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तर उंचावणार आहे.
पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : शहरातील अनेक गाव वाड्यांना जोडणारा मोहाचावाडी येथील जीर्ण पूल चार दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांची रस्त्याअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेला पूल जीर्ण झाला होता. या ठिकाणाहून खडी भरलेला ट्रक जात असताना चार दिवसांपूर्वी तो कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक अडकवून पडला होता. तेव्हापासून हा रस्ता बंद आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आमदार सुरेश लाड यांनी या ठिकाणी पाहणी केली. रविवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पाहणी करून पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला व नेरळ ग्रामपंचायतीला साकवचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी कृषी व दुग्ध, पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, कर्जत उपअभियंता केदार, शेकाप तालुका चिटणीस प्रवीण पाटील, राम राणे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हस्कर, नितेश शाह उपस्थित होते.