परसबागेतील भाज्या माध्यान्ह भोजनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:46 PM2020-02-17T23:46:35+5:302020-02-17T23:46:53+5:30
विद्यार्थ्यांनी घेतली झाडे दत्तक : गोमाशी जिल्हा परिषद शाळेतील स्तुत्य उपक्रम
पाली : ‘माझी आनंददायी शाळा’ या उपक्रमांतर्गत सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा, गोमाशी येथे परसबाग उपक्रम राबविण्यात आला आहे. या परसबागेतील विविध भाज्या विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे पोषण चांगले होत आहे. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांना त्यांची नावे दिली असून या झाडांचे संगोपन विद्यार्थी करीत आहेत. ही झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आहेत. या आदर्शवत उपक्रमाची ख्याती जिल्ह्यात पसरली असून विविध शाळा अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यास पुढाकार घेत आहेत.
रायगड जिल्हा परिषद, गोमाशी शाळेतील विद्यार्थी व गोमाशी शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक तसेच शाळा प्रमुख अजितकुमार जाधव व उपशिक्षिका प्रीती भोजकर या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबविला जात आहे. शालेय परिसरात लावलेल्या पालेभाज्यांचा उपयोग शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेत केला जातआहे. परिणामी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन त्यांचे पोषणदेखील वाढत असल्याची माहिती शाळा प्रमुख अजितकुमार जाधव यांनी दिली.
गोमाशी शाळेच्या परिसरात विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे संवर्धन होण्यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक देऊन वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षण हा सामाजिक उपक्रमदेखील राबविला जात आहे. या माध्यमातून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होत आहे.