नागोठणे : वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने वाहनांच्या कोंडाळ्यात सध्या नागोठणे गुरफटून गेले आहे. बिल्डर सुद्धा इमारतीमध्ये योग्य त्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे अनेक इमारतींमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहात आहेत. भविष्यात पार्किंगचे योग्य ते नियोजन न केल्यास पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. १९८४ नंतर येथे आयपीसीएल (आताची रिलायन्स) चा प्रकल्प आला आणि औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्यामुळे येथे बैठी असणारी घरे जावून इमारती उभ्या करण्याचा कार्यक्र म चालू झाला, तो आजपर्यंत सुरूच आहे. नागोठणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण, एसटी - रेल्वेची मुबलक सुविधा उपलब्ध असल्यामुळे नोकरी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी विभागातील नागरिकांसह नोकरदार वर्गाने येथे स्थायिक होण्याचा सपाटा लावला. याचा फायदा बिल्डर मंडळींनी घेत शहरात अनेक ठिकाणी इमारती उभ्या केल्या.काही इमारती वगळता बहुतांशी इमारतींच्या खाली चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध करण्यात आलेली नाही. केवळ दहा ते वीस सदनिकांमध्ये वाहने पार्क करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी फक्त चार ते आठच वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. बहुतांशी सदनिकाधारकांकडे चारचाकी वाहने असल्याने आपण राहात असलेल्या इमारतीच्या आवारात गाडी उभी करण्यासाठी त्यांना जागाच नसल्याने नाईलाजाने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. इमारतीबाहेर रस्ता नसेल, तर काही वाहने एखाद्याच्या मालकीच्या जागेत संमती घेवून पार्ककरावी लागतात. ग्रामपंचायतीने सुनियोजनासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाहन पार्किंग समस्या गंभीर
By admin | Published: October 05, 2015 11:57 PM