पोलादपूर : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलादपूर पोलिसांकडून पोलादपूर-महाबळेश्वर राज्यमार्गावर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. या वेळी चार चाकी, दुचाकी वाहनांची कसून चौकशी करून तपासणी करण्यात येत आहे. गेले काही महिने कोरोनामुळे वाहनांची तपासणी होत नव्हती. त्या वेळी अनेकदा वाहतुकीचे उल्लंघन होत असे. दुचाकीचालक महामार्गावर ट्रिपल सीटने मार्गस्थ होत होते. तर नियमावली आखून दिली असताना अनेकदा चार चाकी वाहनांमध्ये जादा प्रवासी प्रवास करीत असत. कोणीही वाहने तपासत नसल्याने वाहनधारकांचे फावले होते.
महामार्गावर होणाऱ्या दुचाकीचालकांच्या अपघातांचे जास्त प्रमाण लक्षात घेता नव्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर परिपत्रक फिरत होते. त्याचप्रमाणे जुन्या गाड्यांना बंदीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. बुधवारी सकाळी महाडसह पोलादपूरमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी वाहनांची तपासणी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर मास्कचा वापर करण्याचे वाहनचालकांसह प्रवाशांना सांगण्यात येत होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाबळेश्वर रोडवर पोलादपूर पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी पोलीस हवालदार दीपक जाधव, आर.आर. पवार, गणेश कीर्वे, धायगुडे यांनी वाहनांची कसून तपासणी केली. वाहनधारकांना गाडीची कागदपत्रे गाडीत ठेवणे गरजेचे आहे, तसेच वाहनांच्या वेग मर्यादेबाबत नियमांचे पालन करावे, अशा सूचना तपासणी पोलिसांकडून करण्यात येत होत्या.