वेलटवाडी गाव होणार आत्मनिर्भर , आदिवासींना २२ हक्काची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:54 AM2020-09-03T00:54:53+5:302020-09-03T00:55:04+5:30
अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती.
रायगड : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी देशातील नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीमधील वेलटवाडी आदिवासी वाडीमधील रहिवाशांना आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत त्यांच्या हक्काची २२ घरे बांधून देण्यात येणार आहेत. खानाव ग्रामपंचायत, सरकार आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राज्यातील पहिलाच असण्याची शक्यता आहे.
अलिबाग शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर खानाव ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये डोंगर कपाऱ्यात वेलटवाडी आदिवासी वाडी आहे. वेलटवाडीमधील ग्रामस्थांची घरे २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीने, तसेच ३ जून रोजी झालेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ उद्ध्वस्त झाली होती. डोक्याला दगड आणि आकाश पांघरून घेण्याची वेळ येथील आदिवासी वाडीतील नागरिकांवर आली होती. यासाठी त्यांना वन विभागाच्या जागेमध्ये तात्पुरत्या झोपड्या उभारून देण्यात आल्या. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मदत केली होती,
झोपड्या उभारण्यात आल्याने, वन विभागाने जमीन खाली करण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. तात्पुरत्या झोपड्या दूर करण्याची कार्यवाही वनविभागाने सुरू केली होती. या कार्यवाहीला स्थगिती मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अॅड.प्रवीण ठाकूर यांनी राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड, वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. सरकारकडून निर्णय येत नव्हता, तर दुसरीकडे वन विभाग चांगलेच हट्टाला पेटले होते. ग्रामस्थांनी स्वखर्चाने वेलवली येथे ३१ गुंठे जमीन विकत घेतली. आॅल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्था, रायगड महसूल विभाग आणि खानाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता या जागेत आदिवासींना कायमस्वरूपी २२ घरे बांधून देणार आहे.
या आत्मनिर्भर गावामध्ये घरांसोबतच समाज मंदिर, बगीचे, शौचालये, रस्ते, विद्युत दिवे, सीसीटीव्ही यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.
सरकार, प्रशासन आणि आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. आदिवासी बांधवांच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहिलो आहोत. आताच्या उपक्रमामुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे हे गाव आत्मनिर्भर गाव म्हणून ओळखले जाईल, असे रायगड काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी सांगितले.
अनंत गोंधळी यांनी आदिवासी बांधवांना निवारा मिळण्यासाठी केलेली धडपड खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद यांनी सांगितले.
आत्मनिर्भर गाव भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी (दि.१ सप्टेंबर) रोजी भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार, अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, आॅल इंडिया रिहायब्लिटेशन संस्थेचे डॉक्टर साजिद सैयद, सरपंच अनिता गोंधळी, काँग्रेस उपाध्यक्ष अनंत गोंधळी, जितेंद्र गोंधळी आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या डोंगरावर २५ आदिवासी कुटुंबे गेली दीडशे वर्षे राहत होती. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत वेलटवाडीवरील डोंगराला तडे गेल्याने या आदिवासी कुटुंबाना जिल्हा प्रशासनाने स्थलांतरित करून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शाळेमध्ये आणि बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हलवले. वेलटवाडीवरील आपला संसार उघड्यावर ठेवून ती कुटुंबे शाळेत वास्तव्य करू लागली. प्रशासनाकडून या आदिवासी कुटुंबांच्या वास्तव्यासाठी एका शिक्षकाची जागा, आदिवासींना घरे बांधण्यासाठी देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रशासनाने घरकूल योजनेतून घरे बांधण्याची मंजुरीही दिली. मात्र, याच महिन्यात आलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळाने’ या आदिवासी बांधवांना पुन्हा उघड्यावर आणले. आता वनविभागाच्या वारंवार येणाºया नोटिसांपासून सुटका झाली. गावात स्वत:चे घर मिळणार असल्याने आम्ही समाधानी असल्याचे संदेश गडखळ यांनी दिले.