पेण : उपजिल्हा रुग्णालयात तीन व्हेंटिलेटर उपलब्ध असूनदेखील प्रशिक्षित कर्मचारी व वातानुकूलित यंत्रणेच्या अभावामुळे धूळखात पडून आहेत. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची व्हेंटिलेटरअभावी परवड होत असल्याचे हिंदू जनजागृती समितीने जिल्हाआरोग्य अधिकारी यांना केलेल्या पत्रव्यवहारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकडे पेणमधील सर्व राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या ही बाब लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच नागरिकांमध्येही संतापही व्यक्त केला जात आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतील रायगडसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चार महिन्यांपूर्वी व्हेंटिलेटर देण्यात आली होती. ती जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पेण उपजिल्हा रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर देण्यात आले होते. व्हेंटिलेटर चालविणाऱ्या प्रशिक्षित कर्मचारी, डॉक्टर व सदरची उपकरणे वातानुकूलित खोलीत ठेवावी लागतात ती नसल्याने अडचण होत आहे. सद्य परिस्थिती अतिशय कठीण असून व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते.
क्षणाक्षणाला जीवाभावाची माणसे मृत्युमुखी पडतात. अशा परिस्थितीत तीन व्हेंटिलेटर कार्यरत झाले तर कितीतरी रुग्णांचा जीव वाचेल. पण आरोग्य विभागातील यंत्रणेचे काम, त्यांना लागणारी उपकरणे साधन सामग्रीची स्थानिक राजकारणी व जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी वर्गाने दखल घेतली नाही. हिंदू जनजागृती समितीने जेव्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला तेव्हा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तांदळे यांना विचारले असता त्यांनी या गोष्टीस दुजोरा दिला. पेण रुग्णालयात तीन व्हेंटिलेटर असून त्यासाठी लागणारे निष्णात डॉक्टर, पेरामेडिकल तज्ज्ञ कर्मचारी व वातानुकूलित यंत्रणा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत जर हे व्हेंटिलेटर पेणमधील सुसज्ज हॉस्पिटलने मागणी केल्यास काही कालावधीसाठी ही यंत्रणा करार तत्त्वावर चालविण्यास देता येईल. मात्र यासाठी जिल्हाअधिकारी रायगड यांना लेखी पत्रव्यवहार करून मागणी करता येईल.