वेंगुर्ले : शिरोडा-केरवाडा येथील पात (नौका) मच्छिमारीसाठी जात असताना केळूस-कालवीबंदर भागात अचानकपणे लाटात सापडून बुडाली. कालवीबंदर येथील स्थानिक मच्छिमारांच्या सहकायार्मुळे त्यावरील खलाशी व पात वाचली. मात्र, जाळ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणासही दुखापत झाली नाही. सर्व खलाशी सुखरूप किनाऱ्यावर आले. ही घटना रविवारी सकाळी ९.३०च्या सुमारास घडली.शिरोडा येथील दिवाकर नावाची शिरोडा-केरवाडा येथील उमाकांत दिवाकर मोरजे यांच्या मालकीची मत्स्य परवाना असलेली पात रविवारी मासेमारी करीत केळूस-कालवीबंदर भागात गेली असताना लाटा उसळल्याने खडकाळ भागात होडी बुडाली. त्यामधील १० खलाश्यांसह मालकाने समुद्रात उड्या टाकल्या व पोहत किनारा गाठला. बुडालेली पाती शिरोड्याच्या मच्छिमारांनी स्थानिक कालवीबंदरच्या मच्छिमारांच्या सहकार्याने किनारी आणली. मात्र, पातीवरील जाळी खडकात अडकल्याने ती काढताना फाटली. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. बुडालेली पाती दुपारी दोनच्या सुमारास कालवीबंदर किनाऱ्यावर आणण्यास शिरोडा व कालवीबंदरमधील खलाश्यांना यश आले. त्यामुळे पातीचे होणारे नुकसान टळले. या नौकेवर उमाकांत मोरजे, योगेश मोरजे, समीर उगवेकर, गोविंद कुर्ले, भरत मोरजे, दीपेश मोरजे, रोहन आरावंदेकर, मिलन खवणेकर, बबन कोळंबकर, मंगलदास मोरजे असे १० मच्छिमार होते.
लाटांमध्ये अडकून नौका बुडाली
By admin | Published: August 17, 2015 12:11 AM