मधुकर ठाकूर
उरण - उरण येथील ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक आगरी साहित्य भूषण हरिभाऊ शंकर घरत यांचे शुक्रवारी (१५) अल्पशा आजाराने त्यांच्या भेंडखळ येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. विशेष म्हणजे या वयातही ते साहित्यिक चळवळीत सक्रिय होते व त्याच बरोबर त्यांचे लेखनही सुरू होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती.निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला साहित्य निर्मितीत वाहून घेतले होते.कथा,कादंबरी,कविता अशा वाड़मयाच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीचा ठसा उमटविला होता. अनेक मात्तबर दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.हळद रुसली,पुरस्कार, हे कथासंग्रह,राजयोगी भर्तरीनाथ, धाकले खोत, राजयोगी मच्छिंद्रनाथ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून नवी दिशा हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गी आहे.या शिवाय राजकुंवर ही कादंबरी, महाराष्ट्राचा धैर्यमेरू हे नाटक ,वेचलेले क्षण हा काव्यसंग्रह आदी अप्रकाशित साहित्य त्यांच्या नावावर आहे.
विशेष म्हणजे २०१८ साली त्यांच्याच गावी भेंडखळ येथे झालेल्या अखिल भारतीय आगरी साहित्य आणि विकास मंडळाच्या १८ व्या आगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी रायगड जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक साहित्यिकांबरोबरच सर्वच क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण मराठी साहित्य परिषद, आ.सा. वि.मं.,काव्य दरबार,आचार्य अत्रे कट्टा या साहित्यिक संस्थांबरोबरच समाजातील सर्व थरांतून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.