पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:59 AM2018-04-09T02:59:53+5:302018-04-09T02:59:53+5:30
रायगड जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्याची पुरती दुरवस्था झाली आहे. सोयी-सुविधांची वानवा, औषधे नसल्यातच जमा, इमारतीची पडझड, परिसरात उगवलेले जंगल-झुडपे अशा या पशूंच्या दवाखान्यामध्ये पशूही येण्यास धजावणार नाहीत.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्याची पुरती दुरवस्था झाली आहे. सोयी-सुविधांची वानवा, औषधे नसल्यातच जमा, इमारतीची पडझड, परिसरात उगवलेले जंगल-झुडपे अशा या पशूंच्या दवाखान्यामध्ये पशूही येण्यास धजावणार नाहीत. तेथे अधिकारी आणि कर्मचारी यांना काम करावे लागत आहे. दवाखान्याची जुनी इमारत पाडून तेथे नव्यानेच इमारत बांधण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवण्याची तयारी पशुवैद्यकीय विभाग करणार आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख उद्योगधंदा म्हणून शेतीची ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. त्याच्या जोडीलाच भाजीपाला, आंबा, नारळ, सुपारी, हळद याचेही पीक घेतले जाते. त्यामुळे शेतीशी निगडित असणारे गाय, बैल, शेळ््या-मेंढ्या यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे गावागावामध्ये घोडे, गाढव यांचाही वापर शेतकरी वर्ग करत आहे.
मुक्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने ८० च्या दशकामध्ये अलिबाग-तळकर नगर येथे जिल्हा पशुवैद्यकीय दवाखाना सुरु केला. या दवाखान्यामध्ये सुरुवातीला मोठ्या संख्येने उपचारासाठी मुक्या जनावरांना आणले जात होते. परंतु आता या दवाखान्याची पुरती दैना उडाली आहे. दवाखान्यामध्ये अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग नाही. त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असल्याने धूळ सातत्याने आत येते. त्यामुळे शस्त्रक्रिया विभाग असुरक्षित झाला आहे. त्यामुळे प्राण्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना संसर्ग होण्याचा चांगलाच धोका निर्माण झाला आहे. एक्सरे मशिन, सोनोग्राफी मशिन जुन्या असल्याने त्या अद्ययावत झाल्यास नेमके निदान शक्य होणार आहे. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे इमारत कधी पडेल याचा नेम नाही. त्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
इमारतीच्या परिसरामध्ये झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या परिसराला जंगलाचे स्वरुप आल्याचे दिसून येते.
इमारतीला संरक्षक भिंत नसल्याने कोणीही इमारतीच्या परिसरामध्ये सहज प्रवेश करु शकतात. त्यामुळे चोरांचा धोका निर्माण झाला आहे.
दवाखान्यामध्ये दररोज सुमारे २० प्राणी रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांची तपासणी केल्यावर त्यांना उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा असल्याने बाहेरुन औषधे घ्यावी लागत, असल्याचे राहुल साष्टे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्राण्यांची औषधे नसतात तेव्हा माणसांना देण्यात येणारी औषधे संबंधित डॉक्टर लिहून देतात, असेही साष्टे यांनी स्पष्ट केले. सरकारने या दवाखान्यामध्ये सोयी-सुविधा तरी निर्माण कराव्यात अथवा हा दवाखानाच बंद करुन टाकावा, अशी मागणीही त्यांनी केली. इमारतीच्या तळमजल्यावर ओपीडी आणि पहिल्या मजल्यावरुन प्रशासकीय कारभार हाकला जातो.
>गुरेढोरे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातच आहेत, परंतु जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपचाराची सोय असेल, याची माहिती बहुतांश शेतकºयांना नाही. कारण खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर एक फोन केला की, घरी हजर होतात, असे अॅड. राकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.
>पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे. सरकारकडे सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. इमारतीच्या डागडुजीवर खर्च करण्यापेक्षा येथे नव्यानेच इमारत बांधणे उचित ठरणार आहे. नव्याने इमारत बांधण्याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. धनंजय डुबल, प्र.सहायक आयुक्त,
पशुधन संवर्धन विकास विभाग
>सरकारकडून दखलच नाही
संरक्षक भिंत बांधण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे किरकोळ दुरुस्तीवर २२ लाख खर्च अपेक्षित आहे.
सोयी-सुविधांच्या बळकटीकरणासाठी सुमारे ४८ लाख यासह अन्य असा दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रशासनाकडून नियमितपणे पाठविला जातो. मात्र सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते.
इमारतीच्या परिसरामध्ये झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या परिसराला जंगलाचे स्वरुप आल्याचे दिसून येते.