रुंदीकरणात विजेच्या खांबांचा अडथळा
By admin | Published: May 19, 2017 03:56 AM2017-05-19T03:56:28+5:302017-05-19T03:56:28+5:30
शहरातील रस्ता रुंदीकरणात विजेचे पोल अडथळे ठरत असून त्याचा त्रास पादचारी व वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा ठरणारे रस्त्याच्या मधोमध
- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : शहरातील रस्ता रुंदीकरणात विजेचे पोल अडथळे ठरत असून त्याचा त्रास पादचारी व वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा ठरणारे रस्त्याच्या मधोमध आणि कडेला असणारे वीज खांब हटविण्याची मागणी नागरिकांडून होत आहे.
नेरळ शहरात एमएमआरडी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे २२ कोटी रु पयांची रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे आरसीसी काँक्रीटीकरण करून आठ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. काही भागात ही कामे सुरू असली तरी संथ गतीने पूर्ण होत आहेत.
नेरळ बाजारपेठेतील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहेत. मात्र या रस्त्यावर वीज खांब मधोमध असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात माहिती घेतली असता, शहरातील बाजारपेठेत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहे.
रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी जागा सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही भागात नव्याने विजेचे खांब उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे ३५ लाख रु पयांची तरतूद आहे, परंतु हे काम अद्याप सुरू झालेले नाही. काही वीज खांबावर झाडेझुडपे वाढल्याने शॉर्टसर्किटची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रस्त्यावरील पोल हटविण्याचे काम जिल्हा परिषद करणार आहे. त्यासाठी मंजूर निधीच्या दीड टक्के निधी यासाठी वापरण्यात येणार आहे. यातील काही वीजवाहिन्या जमिनीखालून टाकण्यात येणार आहे, तर काही नव्याने पोल उभारून वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
- मंगेश म्हसकर,
ग्रामपंचायत सदस्य, नेरळ
नेरळ रस्ता रु ंदीकरणात अडथळे ठरणारे विजेचे पोल नेरळ ग्रामपंचायत हटविणार आहे. एमएमआरडीएने हे काम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्याने जिल्हा परिषद नेरळ ग्रामपंचायतीला निधी वर्ग करून विजेचे पोल हटविण्याचे काम करणार आहे.
- एन. बी. शिर्के,
नेरळ शाखाधिकारी, महावितरण
नेरळ रस्ता रु ंदीकरणात अनेक विजेचे पोल अडथळा ठरत आहेत. त्याचा त्रास नेरळकरांना व बाजारात येणाऱ्या नागरिकांना होत आहे, तर अनेक विजेचे पोल झाडाझुडपांनी वेढले आहेत. त्याचाही त्रास मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे. त्यामुळे हे विजेचे पोल लवकरात लवकर हटविण्यात यावेत, अन्यथा येथे अपघात घडल्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल.
- सुमित क्षीरसागर,
ग्रामस्थ, नेरळ