Video - गिधाडाच्या पिल्लाने पुन्हा घेतली आकाशात भरारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 03:44 PM2019-03-08T15:44:25+5:302019-03-08T16:59:18+5:30

सिस्केप संस्था, चिरगाव ग्रामस्थ आणि म्हसळा वनखाते विभागाने पुन्हा एकदा अशक्त झालेल्या गिधाडास सक्षम करून चिरगावच्या आकाशात झेप घेण्याची संधी दिली.

Video - The Vulture flying in the sky | Video - गिधाडाच्या पिल्लाने पुन्हा घेतली आकाशात भरारी 

Video - गिधाडाच्या पिल्लाने पुन्हा घेतली आकाशात भरारी 

Next

जयंत धुळप/अलिबाग 

सिस्केप संस्था, चिरगाव ग्रामस्थ आणि म्हसळा वनखाते विभागाने पुन्हा एकदा अशक्त झालेल्या गिधाडास सक्षम करून चिरगावच्या आकाशात झेप घेण्याची संधी दिली. एक महिन्यापूर्वी चिरगावच्या गिधाड वसाहतीतील एका घरट्यातून पडलेले गिधाडाचे पिल्लू चिरगाव बागेची वाडी येथील ग्रामस्थांना आढळले. तत्परतेने या पिल्लास सिस्केप व वनखात्याला कळवून ग्रामस्थांनी जीवदान दिल्याने गिधाड संवर्धन चळवळीतील सर्वच घटक किती सतर्क आहेत याची पुन्हा एकदा खात्री पटू लागली आहे.

गिधाडांची जगातील घटती संख्या एकूणच पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला घातक होत राहिल्याने सिस्केप संस्थेच्या प्रेमसागर मेस्त्री यांनी 19 वर्षापूर्वी सुरू केलेल्या म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पामुळे नैसर्गिकरित्या गिधाडांची संख्या जवळजवळ 250 पर्यंत पोहचली आहे. यातही अनेक समस्यांचा परामर्श घेत सिस्केप संस्था हे संवर्धन कार्य पुढे नेत आहे. याकरीता चिरगाव ग्रामस्थ, वनखाते आणि येथील दानशूर नागरीक यामुळे हे संवर्धन सुरू असले तरी समस्या या येतच असतात. त्यातच पिल्लांच्या संगोपनातील अडचणीवर देखील कष्टाने मात करीत सिस्केप संस्थेचा हा गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू आहे. 

11 फेब्रुवारी 2019 रोजी चिरगाव बागेची वाडी येथील योगेश बारी यांचे घराचे मागील असणाऱ्या झाडाखाली गिधाडांचे पिल्लू पडलेले आढळले. मोहन शिंदे, किशोर घुलघुले, योगेश बारी यांनी तातडीने सिस्केप संस्था व वनखात्यास कळवले. घटनास्थळी प्रेमसागर मेस्त्री, योगेश गुरव व म्हसळा वनखात्याचे पाटील व बनसोडे पोहचल्यावर गिधाडाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या पिल्लाचे तोंडातून दीड मीटर ओढणीचा धागा काढला. तो धागा अन्ननलिकेत अडकल्याने ते गिधाडाचे पिल्लू आठ ते दहा दिवस काहीच अन्न खाऊ शकले नव्हते. या उपासमारीने त्याचे वजनही व फॅटही कमी झाले होते. आठ दिवस त्याला अतिसुरक्षित ठिकाणी बंदिस्त घरात ठेवण्यात आले. गेले महिनाभर त्या पिल्लाचे पाणी आणि चिकनचे मांस देऊन पालनपोषण करण्यात आले. महिन्याभरात त्याला योग्य तो आहार मिळाल्याने त्याचे वजन व त्यातील फॅट वाढल्याचे सिस्केप संस्थेकडून करण्यात आलेल्या नोंदीवरून दिसले. गेले काही दिवस त्याला दोरी बांधून उडण्याचा सराव देखील सिस्केप संस्थेकडून करण्यात आला होता. आज याच पिल्लास चिरगावच्या आकाशात उंच भरारी घेताना चिरगावच्या ग्रामस्थ, शाळकरी मुलांनी आनंद व्यक्त केला. आज सकाळी साडेअकरा वाजता वनखात्याचे रोहा येथील वनअधिकारी गोडबोले, म्हसळा वनक्षेत्र कर्मचारी, भेकराचाकोंड ग्रामस्थ आणि चिरगाव ग्रामस्थांच्या साक्षीने त्या गिधाडाच्या पिल्लाने पुन्हा आपल्या वस्तीकडे जाण्यासाठी महाकाय पंख विस्तारले. यावेळी सिस्केपसंस्थेचे योगेश गुरव, अविनाश घोलप, मिलिंद धारप, सौरभ शेठ, चितन वैष्णव, मित डाखवे, प्रणव कुलकर्णी, ओम शिंदे, चिराग मेहता, अक्षय भावरे, तुषार चव्हाण उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाड संवर्धनातील ग्रामस्थांचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखीत केले. या संवर्धनातील येणाऱ्या समस्यांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी आपण तत्पर राहण्याविषयी मेस्त्री यांनी पुनरुच्चार केला. यावेळी रोहा वन विभागाचे प्रमुख गोडबोले यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Video - The Vulture flying in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग