Vidhan sabha 2019 : महाडमध्ये शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन, भरत गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:55 AM2019-10-02T02:55:17+5:302019-10-02T02:55:42+5:30
महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला.
दासगाव - महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला.
अर्ज दाखल करताना दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख विजय खुळे, प्रमोद घोसाळकर, महाड विधानसभा सहसंपर्कप्रमुख विजय सावंत हे उपस्थित होते. शक्तिप्रदर्शन करताना छ. शिवाजी चौकामधील सभेला संबोधित करताना या पुढचे आमदार आपणच असणार असून, ३५ हजारांच्या फरकाने निवडून येण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. अर्ज दाखल केल्यानंतर भरत गोगावले यांनी छ. शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज यांच्यासह सर्व देवी-देवतांचे दर्शनही घेतले.
महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सभेत आ. गोगावले यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. आम्ही सर्वसामान्य माणसाच्या गरजा ओळखून काम करतो, म्हणूनच दोन वेळा लोकांनी निवडून दिले आहे. आताही या निवडणुकीत आम्ही पुन्हा विजयी होऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला. लोकांना दुपारपर्यंत झोपणारा आमदार नको आहे तर दिवसरात्र लोकांची सेवा करणारा आमदार पाहिजे, अशा शब्दात विरोधकांवर तोफ डागली. शिवसेनेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांचे काय झाले, हे उभ्या महाराष्टÑाने पाहिले आहे. यामुळे शिवसेनेचा नाद करायचा नाही, अशा शब्दात राष्टÑवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा समाचार घेतला.
या वेळी व्यासपीठावर युवा सेना अधिकारी विकास गोगावले, सुषमा गोगावले, पद्माकर मोरे, सुभाष पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जाहीर सभेनंतर छ. शिवाजी महाराज चौक ते महाड प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झाले होते.
मित्रपक्षांचे फक्त झेंडे दिसले पदाधिकारी गायब
भरत गोगावले यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना-भाजप युती झाली. यामुळे महाड विधानसभा मतदारसंघात आता भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात शिवसेना-भाजपबरोबर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व इतर मित्रपक्षही आहेत. मात्र, मंगळवारी भरत गोगावले यांनी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर केवळ शिवसेनेचे पदाधिकारीच उपस्थित होते. घेतलेल्या सभेदरम्यानही व्यासपीठावर केवळ भाजप-आरपीआयचे झेंडेच असल्याचे निदर्शनास आले.
रवि पाटील यांना महायुतीतर्फे अधिकृत उमेदवारी
पेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांतिमित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रवि पाटील यांची अधिकृत उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत रवि पाटील यांचे नाव जाहीर झााले व पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके लावून एकच जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्याने त्यांनी केलेला पक्षप्रवेश व मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द अखेर पाळल्याची भावना कार्यकर्त्यांना पटली. येत्या १० ते १५ दिवसांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष, राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे गट आघाडीचे आमदार धैर्यशील पाटील यांच्याशी प्रमुख लढत होणार आहे.
एकंदर येत्या दहा दिवसांत भारतीय जनता पक्षाविरुद्ध शेकाप अशी चुरशीची होईल, असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे.