Vidhan Sabha 2019: कर्जत मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:57 PM2019-09-26T22:57:10+5:302019-09-26T22:57:42+5:30
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, मात्र अद्याप शिवसेनेचा उमेदवार कोण? याबाबत ठोस निर्णय झाला नाही.
कर्जत : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, मात्र अद्याप शिवसेनेचा उमेदवार कोण? याबाबत ठोस निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान आमदार सुरेश लाड यांनाच पुन्हा उमेदवारी देणार आहे, यात शंका नाही. भाजपच्या वतीने माजी आमदार देवेंद्र साटम यांनी बैठकासुद्धा सुरू केल्या आहेत. भाजप - शिवसेना युतीची घोषणा होत नाही तोपर्यंत कोणा कोणात लढत होईल हे स्पष्ट होणार नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
यंदाच्या कर्जत विधानसभा निवडणुकीची परिस्थिती २०१४ च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. त्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेकापक्ष हे प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड निवडून आले होते. शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांना तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले कारण ऐन वेळेला उमेदवारी न मिळालेले महेंद्र थोरवे यांनी बंड पुकारून शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी स्वीकारून अगदी विजयासमीप झेप घेतली होती; परंतु थोडीशी ‘भाऊबंदकी’ आड आल्याने त्यांचा अवघ्या अठराशे मतांनी निसटता पराभव झाला. त्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांनी पुन्हा शिवबंधन बांधले.
शिवसेना - भाजप युती शंभर टक्के होणार असे दोन्ही जबाबदार नेत्यांकडून बोलले जाते. जागावाटपाचा मुहूर्त घटस्थापनेच्या दिवशी काढला आहे. त्या वेळी युतीतर्फे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली जाईल ते समजेल. माजी आमदार देवेंद्र साटम यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यांनी बूथ कमिट्यांचे अध्यक्ष व शक्ती केंद्राच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना संबोधित केले. शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी आठ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दोन वेळा या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला आहे; त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा असे खासगीत बोलले जाते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - शेतकरी कामगार पक्ष यांची आघाडी आहे. कर्जतची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, तसेच जयंत पाटील आदींची ईडी चौकशी होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक आहे.
खरे तर या मतदारसंघात शिवसेनेची नव्वद हजारांपेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मागीलवेळी बंडखोरी करून शेकापक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले महेंद्र थोरवे, शिवसेनेचे मागील वेळचे उमेदवार हनुमंत पिंगळे, २००४ मध्ये शेकापक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले सध्या शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख असलेले संतोष भोईर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर आदींचा समावेश आहे. ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्या वेळी खरा उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. तोपर्यंत उमेदवार गुलदस्त्यातच राहील.