विक्रमगडमध्ये 400 कुटुंबांवर आली अंधारात राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:30 AM2021-03-01T00:30:31+5:302021-03-01T00:30:41+5:30

वीजजोडणीची प्रतीक्षा : वीज मीटरच्या तुटवड्याचे महावितरणचे कारण

In Vikramgad, 400 families had to live in darkness | विक्रमगडमध्ये 400 कुटुंबांवर आली अंधारात राहण्याची वेळ

विक्रमगडमध्ये 400 कुटुंबांवर आली अंधारात राहण्याची वेळ

Next

- राहुल वाडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : राज्यभरात अनेकांना हजारोंची वीजबिले आलेली आहेत. तर दुसरीकडे विक्रमगड तालुक्यातील शेकडो नागरिक वीजजोडणी मिळावी या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील ४०० नागरिकांनी वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत. अर्जासोबत आगाऊ रक्कमही भरली  आहे, परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही यांना वीजजोडणी दिलेली नसल्याने साधारणपणे ४०० पेक्षा जास्त कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर वीजमीटरच्या तुटवड्यामुळे वीजजोडण्यांना विलंब होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


तालुक्याच्या ठिकाणीही आज प्रत्येक घरात टीव्ही, फ्रीज, फॅन अशा विजेवर चालणाऱ्या वस्तू आहेत, परंतु अद्यापही या घरात वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे घरात असणारी ही उपकरणे धूळखात पडली आहेत. नागरिकांना मोबाइल चार्ज करण्यासाठीही ज्यांच्या घरी वीजजोडणी आहे अशा शेजारच्यांची मदत घ्यावी लागते. एकीकडे घरगुती वस्तू ते अगदी विजेवर चालणारी वाहनेही बाजारात आली आहेत. मात्र दुसरीकडे विक्रमगडसारख्या आदिवासी ग्रामीण भागात वीज मीटर मिळवण्यासाठी नागरिकांना महावितरणचे उंबरे झिजवावे लागत आहेत. दररोज महावितरणकडे वीजजोडणीसाठी नवीन अर्ज येत आहेत. परंतु त्यांना जोडणी मिळत नाही. त्यामुळे शेकडो कुटुंबांना विनाकारण त्रास तर होतोच, पण त्या घरातील विद्यार्थी, नोकरदारांचे या कोरोनाच्या काळात नुकसानही झाले आहे.

 आम्ही वीजजोडणीसाठी पैसे भरले आहेत. तीन महिने झाले तरी अजून वीज मीटर मिळालेले नाही. आम्ही बऱ्याचदा महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या मारून विनंती केली. लवकरच मीटर येतील असे सांगितले जात आहे. 
- भूषण महाले, नागरिक

नागरिकांच्या मागणीनुसार वीजजोडण्या चालू आहेत. परंतु मीटरचा तुटवडा असल्याने वीजजोडणी देताना अडचणी येत आहेत. तरी मार्च अखेरपर्यंत सर्व अर्जदारांना  वीजजोडणी देण्यात येईल.
 - महेश नागो, कार्यकारी अभियंता, 
महावितरण कार्यालय, विक्रमगड

Web Title: In Vikramgad, 400 families had to live in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.